Wed, Mar 27, 2019 06:40होमपेज › Konkan › रस्ता दुरुस्तीसाठी बेमुदत उपोषण

रस्ता दुरुस्तीसाठी बेमुदत उपोषण

Published On: May 10 2018 1:36AM | Last Updated: May 09 2018 11:20PMसाटेली-भेडशी : वार्ताहर

पिकुळे तिठा ते उसप दरम्यानच्या रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करूनही त्याकडे बांधकाम विभागाचे अधिकारी कानाडोळा करत असल्याच्या निषधार्थ उसप ग्रामस्थांनी बुधवारी (दि.9) जि. प. बांधकाम विभागाविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले. जोपर्यंत रस्ता दुरुस्तीबाबत लेखी आश्‍वासन मिळत नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

पिकुळे तिठा ते उसप या चार कि.मी.च्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने खड्डे चुकविताना दुचाकीस्वारांचे अपघातही घडले आहेत. त्यामुळे रस्त्याची डागडुजी करावी, या मागणीसाठी वारंवार निवेदने देण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींचे लक्षही वेधण्यात आले. मात्र, रस्ता दुरुस्ती संदर्भात कोणतीच कार्यवाही झाली नाही.

त्यामुळे उसप सरपंच दिनेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी उसप तिठा येथे उपोषणास सुरुवात केली. यावेळी उपसरपंच नारायण गवस, प्रकाश गवस, नीलेश नाईक, प्रवीण गवस, प्रज्योत गवस, अमोल तोरसकर, रामचंद्र गवस, बाबाजी देसाई, बाबाजी गवस, संजय सुतार यांनी उपोषणात सहभाग घेतला. जोपर्यंत रस्ता दुरुस्तीचे ठोस आश्‍वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.