Mon, Aug 19, 2019 11:52होमपेज › Konkan › ‘जनआक्रोश’ आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच

‘जनआक्रोश’ आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच

Published On: Mar 24 2018 1:50AM | Last Updated: Mar 23 2018 10:52PMदोडामार्ग : प्रतिनिधी

दोडामार्ग तालुक्यातील हजारो नागरिकांनी आरोग्याच्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या बेमुदत आंदोलनाला शुक्रवारी चार दिवस झाले, तरी जिल्हाधिकार्‍यांनी आंदोलनास भेट दिली नसल्याने आंदोलकांनी जाहीर निषेध केला. रविवार (25 मार्च)पर्यंत मागण्यांची पूर्तता झाली नाही तर  सोमवारी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संयोजकांच्या वतीने वैभव इनामदार यांनी  पत्रकार परिषदेत दिला. 

मंगळवार (दि.20 मार्च) पासून येथील तहसील कार्यालयासमोर तालुकावासीयांनी बेमुदत जनआक्रोश आंदोलनाला प्रारंभ केला आहे. गेले चार दिवस  तालुक्यातील हजारो स्त्री-पुरुष या आंदोलनात सहभागी होत आहेत. या कालावधीत अनेक राजकीय पुढार्‍यांनी आंदोलकांची भेट घेऊन विविध आश्‍वासने दिली, पण आंदोलकांनी या राजकीय आश्‍वासंनावर विश्‍वास न ठेवता ठोस कार्यवाहीपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. 

गेल्या चार दिवसात आम्हाला केवळ पोकळ आश्‍वासने  मिळालीत, यासाठी महाराष्ट्र सरकारला रविवार 25 मार्चपर्यंत आम्ही डेडलाईन देत आहोत. या दोन दिवसांत जर आमच्या मागण्यांवर ठोस निर्णय झाला नाही तर सोमवारपासून हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा सज्जड इशारा तालुकावासीयांच्यावतीने संयोजकांनी दिला आहे. 

गोवा राज्यात 1 जानेवारी 2018 पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांकडून रुग्ण शुल्क फी घेतली जात आहे. ही सेवा पूर्वीप्रमाणे मोफत मिळावी आणि दोडामार्ग तालुक्यातील आरोग्याच्या मूलभूत सेवा उपलब्ध व्हाव्यात, आदी मागण्यांसाठी हे जनआक्रोश आंदोलन सुरू आहे.  गोवा राज्याचा हा निर्णय समस्त सिंधुदुर्गवासीयांना लागू पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील इतर सातही तालुक्यांनी आप-आपल्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसावे, असे आवाहन येथील संयोजक कमिटीने केले आहे.

दै. ‘पुढारी’चे विशेष आभार

शुक्रवारी दै. ‘पुढारी’ सिंधुदुर्ग आवृत्तीमध्ये आरोग्याचा जनआक्रोश या आंदोलनावर जनआक्रोशाचा धनी कोण? ‘दोडामार्गवासीयांची एकजूट परिवर्तनाच्या टप्प्यावर’ हा विशेष लेख आवृत्तीप्रमुख गणेश जेठे यांनी लिहिला. याबाबत ‘पुढारी’ दैनिकाचे विशेष आभार आंदोलनस्थळी संयोजकांनी मानले.