Tue, Apr 23, 2019 08:26होमपेज › Konkan › ‘हर हर महादेव’चा गजर!

‘हर हर महादेव’चा गजर!

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 13 2018 11:03PMरत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी शहरानजीक असलेल्या स्वयंभू काशीविश्‍वेश्‍वर, संगमेश्‍वर तालुक्यातील प्रसिद्ध मार्लेश्‍वर आणि राजापूर तालुक्यातील धूतपापेश्‍वरसह जिल्ह्यातील अनेक शिवमंदिरांमध्ये हजारो भाविकांनी मंगळवारी ‘हर हर महादेव’ असा गजर करीत महाशिवरात्रौत्सव उत्साहात  साजरा केला.  

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी   शिवमंदिरांमध्ये सकाळपासूनच मोठ्या संख्येने अभिषेकासह बेलभंडारा वाहण्यासाठी गर्दी केली होती.  रत्नागिरी शहरातील काशीविश्‍वेश्‍वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून मंदिरात भाविकांनी रीघ लावून शिवदर्शन घेतले. यानिमित्त 7 पहारेकरी मंडळ, राजीवडा आणि देवस्थान विश्‍वस्त समितीतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  तसेच भजन आणि नामस्मरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाविकांनी  मोठ्या संख्येने उपस्थिती  राहून कार्यक्रमांचा लाभ घेतला.

जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवस्थळ मानल्या जाणार्‍या मार्लेश्‍वर या ठिकाणीही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. राजापुरातील धूतपापेश्‍वर येथील मंदिरातही शिवलिंगावर बेलाचा अभिषेक करण्यासाठी भाविकांची वर्दळ होती. जिल्ह्यातील अन्य मंदिरातही महाशिवरात्र साजरी करण्यात आली.

रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोेळे येथील सिद्धेश्‍वर मंदिरासह सोमेश्‍वर येथील शिवमंदिरात यानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त बुधवारी या मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसाद कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिद्धेश्‍वर मंदिर विश्‍वस्त समितीचे सूरज वाडकर आणि मंगेश पाटील यांनी केले आहे.