Tue, Mar 19, 2019 15:31होमपेज › Konkan › मालवणात आदेश धुडकावून मच्छीमारांचा मोर्चा

मालवणात आदेश धुडकावून मच्छीमारांचा मोर्चा

Published On: Feb 21 2018 1:20AM | Last Updated: Feb 20 2018 10:00PMमालवण : प्रतिनिधी 

परराज्यातील बोटींवर कारवाई झालीच पाहिजे..... एलईडी पर्ससीन हटाव....मच्छीमार बचाव....अशा गगनभेदी घोषणा देत जिल्हा पोलिस अधीक्षकांचा मनाई आदेश धुडकावून व तहसीलदारांची मोर्चाला परवानगी नसतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मालवण तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. यावेळी हजारोंच्या संख्येने मच्छीमार उपस्थित होते. समुद्रातील परराज्यातील मासेमारी न रोखल्यास यापुढे मोठा संघर्ष पेटेल, असा  इशारा माजी खा. नीलेश राणे यांनी मोर्चाप्रसंगी दिला. 

स्थानिक मच्छीमारांनी गोव्यातील तीन पर्ससीन नौका, एलईडी मासेमारी करताना आढळून आल्याने भरसमुद्रात  हल्लाबोल आंदोलन केले होते. यानंतर पोलिसांनी मच्छीमारांवर गंभीर गुन्हे दाखल करून धरपकड  मोहीम सुरू केल्याने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खा. नीलेश राणे यांनी स्वाभिमान पक्षाच्या वतीने मच्छीमारांना निषेध मोर्चाची हाक दिली होती. 

मालवण तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. सकाळी 11 वाजता भरड बाजारपेठ ते तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला, देवगड, विजयदुर्ग या ठिकाणचे हजारो मच्छीमार सहभागी झाले होते. 

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जि. प. अध्यक्ष रेश्मा सावंत, बांधकाम सभापती संतोष साटविलकर,  स्वाभिमान पक्ष तालुकाध्यक्ष मंदार केणी,  डॉ. जितेंद्र केरकर, श्रमिक मच्छीमार  संघाचे अध्यक्ष छोटू सावजी, रत्नागिरी मच्छीमार कृती समिती जिल्हाध्यक्ष खालिद वस्ता, आदी उपस्थित होते.  
या भव्य मोर्चाप्रसंगी मच्छीमार महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी मोर्चाप्रसंगी छोटू सावजी, कृष्णनाथ तांडेल, खालिद वस्ता, सुदेश आचरेकर यांनी संबोधित  केले.