Mon, May 20, 2019 22:58होमपेज › Konkan › खेर्डीमध्ये होणार ‘काँटे की टक्‍कर’

खेर्डीमध्ये होणार ‘काँटे की टक्‍कर’

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 14 2018 10:55PMचिपळूण : खास प्रतिनिधी

खेर्डी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत चुरशीची लढत रंगणार आहे. राष्ट्रवादीविरूद्ध शिवसेना व अपक्षांची आघाडी यामुळे खेर्डी ग्रा.पं.च्या प्रभाग क्र. 3 मध्ये रंगतदार लढत होणार आहे.

खेर्डी माळेवाडी, दत्तवाडी अशा प्रभाग क्रमांक तीनमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणचे ग्रा.पं. सदस्य नितीन ठसाळे हे पंचायत समितीवर निवडून गेल्यानंतर त्यांनी ग्रा.पं. सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्‍त झालेल्या जागेसाठी 25 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये काँटे की टक्‍कर होणार आहे. खेर्डीचे माजी सरपंच प्रशांत यादव यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपले अस्तित्त्व सिद्ध करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून माळेवाडी येथील बाळा दाते, शिवसेना पुरस्कृत शरद सुर्वे तसेच एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होत आहे. 

राष्ट्रवादीचे बाळा दाते यांच्या पाठीशी पं. स. सदस्य नितीन ठसाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयेंद्रथ खताते, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, जि. प. सदस्या दिशा दाभोळकर व अन्य पदाधिकार्‍यांची खंबीर साथ आहे. या प्रभागात 1 हजार 400 मतदार आहेत. त्यामुळे या ठिकाणी जोरदार लढत होणार आहे. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून राष्ट्रवादीचे तीनही सदस्य निवडून आले होते. त्यामुळे ही पोटनिवडणूक राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई आहे. 

दुसर्‍या बाजूला सेनेकडून रिंगणात असलेले सतीश सुर्वे यांना माजी सरपंच प्रशांत यादव यांच्या गटाने खंबीर पाठिंबा दिला आहे. प्रशांत यादव हे याच प्रभागातून अनेकदा ग्रा.पं. सदस्य म्हणून निवडून आले व त्यांनी सरपंचपदही भूषविले आहे. या जोरावर सेना आणि प्रशांत यादव यांच्या मतांची बेरीज होत असल्याने राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे राहिले आहे. अन्य अपक्ष उमेदवार किती मते घेतो हे महत्त्वपूर्ण असून प्रशांत यादव यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. अवघ्या एका प्रभागात निवडणूक असतानादेखील खेर्डीच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांची लक्ष लागून राहिले आहे.