Sun, Apr 21, 2019 06:05होमपेज › Konkan › व्यापार्‍यावरील प्राणघातक हल्ल्याने कणकवलीत खळबळ

व्यापार्‍यावरील प्राणघातक हल्ल्याने कणकवलीत खळबळ

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 10:10PMकणकवली : प्रतिनिधी

कणकवली शहरातील विद्यानगर येथे कणकवली कॉलेजनजीक राहणारे  व्यापारी दत्तात्रय उर्फ बाबा गोविंद गोवेकर (74) यांच्या बंगल्यात घुसून त्यांच्यावर व त्यांच्या पत्नीच्या तोंडावर स्प्रे फवारत बाबा गोवेकर यांच्या डोक्यावर रिव्हॉल्वर मारून गंभीर दुखापत करणार्‍या आरोपीचे धागेदोरे अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. डोक्यात हॅल्मेट, हातात हँडग्लोज आणि चेहरा पूर्णपणे झाकून तोंडाने न बोलता केवळ हाताच्या खुणेने इशारे करत हल्ला करणार्‍या या आरोपीचा उद्देश श्री. गोवेकर यांच्या घरात चोरीचा होता की त्यांना मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा होता? हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. आरोपीचा शोध घेण्यासाठी कणकवली पोलिसांनी दिवसभर एलसीबी पथकाच्या साथीने तपास केला. मात्र रात्री उशिरापर्यंत तरी आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले नव्हते. 

सोमवारी रात्री 9 वा. च्या सुमारास बाबा गोवेकर यांच्या बंगल्याची बेल वाजल्याने त्यांच्या पत्नी सौ. जयश्री गोवेकर यांनी मुलगा आला असेल म्हणून दार उघडले असता 30 ते 35 वर्षाचा अज्ञात इसम दरवाजावर उभा होता. त्याच्या डोक्यात हॅल्मेट होते. दार उघडताच त्याने उग्र वासाचा स्प्रे सौ. गोवेकर यांच्या चेहर्‍यावर मारला. त्यामुळे त्या घाबरल्या आणि आरडाओरडा केला असता बंगल्यातील आतील खोलीत टिव्ही बघत असलेले बाबा गोवेकर हे बाहेर आले. एव्हाना आरोपीने घराच्या मुख्य दरवाजाची आणि हॉलच्या दुसर्‍या दरवाजाची कडी लावून घेतली आणि बाबा गोवेकर यांच्याही चेहर्‍यावर स्प्रे मारला. तसेच त्या दांम्पत्याला तोंडाने न बोलता खुणेने एकत्र उभे राहण्याचा इशारा केला. मात्र, तो त्यांनी न जुमानल्याने आरोपीने त्याच्या हातातील रिव्हॉल्वरच्या दस्ता बाबा गोवेकर यांच्या डोक्यावर मारून दुखापत केली. त्यावेळी गोवेकर यांनी त्याला ढकलून हॉल मधील दुसर्‍या दरवाजाची कडी काढून मागच्या बाजूने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने त्यांचा पाठलाग करून त्यांना ढकलून दिल्याने ते पायरीवर खाली पडले. यामध्ये  त्यांच्या हाताला दुखापत झाली. मात्र  प्रसंगावधान ओळखत बाबा गोवेकर यांनी आरडाओरड केल्याने आरोपी घराच्या उजव्या बाजूच्या कठड्यावरून उडी मारून पळून गेला. तरी बाबा गोवेकर गेटपर्यंत ओरडत गेले. एव्हाना आरडाओरडा ऐकून आसपासचे लोक जमा झाले होते. या हल्ल्यात बाबा गोवेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. 

घटनेनंतर तात्काळ पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी व अन्य अधिकारी, पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. बंगल्याची पोलिसांनी तपासणी केली, बंगल्याच्या आसपास नाकाबंदीही केली. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. रात्री स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथकही तपासासाठी दाखल झाले होते.  मंगळवारी दिवसभर पोलिसांनी बाबा गोवेकर यांच्या बंगल्याच्या परिसरातील आजूबाजूचे तसेच शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. शहरात सायंकाळच्या दरम्यान एका दुकानावर कोल्ड्रींक्स पिण्यासाठी एक संशयित स्थितीतील इसम आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी व  कर्मचार्‍यांनी शहरात त्याचा शोध घेतला. मात्र, तो हाती लागू शकला नाही. तरीही तो आसपासच्या परिसरातच असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

बाबा गोवेकर यांच्या प्रकृतीत सुधारणा या प्राणघातक हल्ल्यात बाबा गोवेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर कणकवलीतील खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. सायंकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सायंकाळी त्यांच्या पत्नीने कणकवली पोलिसात याबाबतची फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरटच्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दिवसभर कणकवलीसह जिल्ह्यातील अनेक व्यापारी बांधवांनी बाबा गोवेकर यांच्या निवासस्थानी येऊन प्रकृतीची विचारपूस केली. 

आरोपी स्थानिक असण्याची शक्यता?

आरोपीने बाबा गोवेकर यांच्या बंगल्यावर पाळत ठेवून हा प्राणघातक हल्ला केला. सोमवारी रात्री गोवेकर यांचा मुलगा लीलाधर दुकानातून घरी आला आणि काही कामा निमित्त थोड्या वेळातच निघून गेला. दुकानातील दिवसभरातील रक्कम त्याने घरी आणली होती. मात्र, जर आरोपीचा चोरीचा उद्देश असता तर या रक्कमेवर तो गोवेकर दांम्पत्यावर हल्ला करून डल्ला मारू शकला असता किंवा श्रीमती गोवेकर यांच्या अंगावरील दागिनेही तो हिसकावू शकला असता. मात्र तसा कोणताही प्रकार त्याने केला नाही. त्यामुळे या घटनेमागे चोरीचा उद्देश नसावा तर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी दिवसभराच्या तपासावरून वर्तविला आहे. तरीही सर्व शक्यता पोलिस पडताळून पाहत आहेत. जोपर्यंत आरोपी हाती लागत नाही तोपर्यंत कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहचता येणार नाही, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र आरोपीने या घटनेवेळी बोलण्याचे टाळल्याने आणि पूर्णपणे शरीर झाकून घेतल्याने तो स्थानिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत.