होमपेज › Konkan › सावंतवाडी : २५ लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त

सावंतवाडी : २५ लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त

Published On: Apr 08 2018 8:39PM | Last Updated: Apr 08 2018 8:39PMसावंतवाडी :   प्रतिनिधी 

सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली - डोबवाडी येथे सिंधुदुर्ग पोलिसांनी केलेल्या पहिल्या अवैध गुटखा साठा जप्तीच्या कारवाईनंतर याच भागातील निगुडे येथे आज, रविवार (8 एप्रिल) दुसरी कारवाई करीत सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सुमारे 25 लाख रुपयांचा अवैध गुटखा साठा जप्त केला. याप्रकरणी भूषण उर्फ आबा श्रीकृष्ण शिरसाट (वय 50, रा. इन्सुली - डोबाशेळ) याच्याविरोधात कारवाई करण्यात आली. एलसीबी विभागाने केलेल्या या दोन मोठ्या कारवाईत सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईबद्दल जिल्हा पोलिसांचे कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्यासह  पोलिस कर्मचाऱ्यांनी पथकाने निगुडे गावातील मधलीवाडीत गावडे यांच्या घराभोवती शोध मोहीम घेतली असता सर्वाधिक अवैध गुटखा साठा आढळून आला. या अवैध गुटख्याची बाजारात किंमत सुमारे 25 लाख रुपये असून यापूर्वी इन्सुली येथे 27 मार्चला केलेल्या कारवाईत 21 लाख 34 हजार 800 रुपयांचा  गुटखा साठा जप्त करण्यात आला होता. 

दरम्यान, या कारवाईत जप्त केलेला गुटखा खाण्यायोग्य आहे की नाही याची तपासणी फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर संबधितावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 
 

Tags : Sawantwadi, Sawantwadi news, illegal gutkha, seized,