Thu, Feb 21, 2019 02:58होमपेज › Konkan › जिल्ह्यात गुटखा बंदी कागदावरच

जिल्ह्यात गुटखा बंदी कागदावरच

Published On: May 01 2018 1:16AM | Last Updated: Apr 30 2018 8:06PMगिमवी : वार्ताहर

महाराष्ट्र शासनाने राज्यात आरोग्यास अपायकारक असणार्‍या गुटख्याच्या उत्पादनास विक्री करण्यास बंदी घालून त्यापासून मिळणार्‍या करोडोच्या महसुलावर पाणी सोडले. मात्र, गुटखा बंदी कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अन्‍न औषधे प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी तसेच पोलिस यंत्रणेतील अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात गुटखा बंदी केवळ कागदावरच राहिली आहे. कर्तव्यात कसूर करून लाखोंची माया जमा करणार्‍या अधिकार्‍यांमुळे गुटखा बंदीचे पुरते तीन तेरा वाजल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.

अन्‍न औषधे प्रशासनाने चिपळूण शहरात व गुहागर तालुक्यात शृंगारतळीत तर खुलेआम सर्वच पान टपर्‍यांवर चढ्या भावाने गुटखा विकला जात आहे. स्वतःहून संबंधित अधिकारी वर्गाकडून गुटख्याविरोधात कारवाई केल्याची प्रकरणे बोटावर मोजण्याइतकी आढळतात. गुटखा विक्रेत्यांवर कारवाई झाल्यानंतरही गुटखा विक्री खुलेआम सुरूच आहे. नव्हे ती पूर्वीपेक्षा अधिकच जोरात सुरू असल्याचे पाहण्यात येत आहे. मात्र, वाममार्गाने विनासायास ‘लक्ष्मी ’ घरी येत असल्याने अधिकार्‍यांकडून कारवाई करण्याकडे हेतूपुरस्सर कानाडोळा केला जात आहे.

जिल्ह्यात बहुतांश सर्वच पानटपर्‍यांवर खुलेआम चढ्या भावाने गुटखा विक्री होत आहे. या गुटखा विके्रत्यांकडून त्यांना गुटखा सप्लाय करणारा बडा गुटखा विक्रेता मासिक हप्ते गोळा करून अधिकार्‍यांना पोहोचविण्याचे काम करीत असतो व स्वतःचादेखील लाखो रूपयांचा हप्ता देत असतो. सर्व संबंधित यंत्रणांना मॅनेज करून खुलेआम गुटख्याचा अवैध धंदा जिल्ह्यात तेजीत चाललेला आहे. त्यावर कुणाचेही कसल्याही प्रकारचे नियंत्रण राहिलेले नसल्याने गुटख्याच्या आहारी गेलेली युवा पिढीचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. अनेकांना तोंडाच्या कॅन्सरची लागण झालेली असून काहींचा आजार प्राथमिक स्टेजला आहे व हे सर्व खुलेआम उपलब्ध होणार्‍या गुटख्यामुळेच घडत आहे.

महाराष्ट्र शासनाने गुटखा बंदी लागू करून कायदा केला. मात्र, या कायद्यात गुटखा विक्रेता पकडला गेल्यास त्याला लगेच अटक होत नाही. माल जप्त केला जातो. नमुने तपासणी अहवालात तथ्य आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई होते. त्यामुळे गुटखा बंदीच्या कायद्याची भीती विक्रेत्यांमध्ये राहिलेली नाही. त्यातच अधिकारी आमिषाला बळी पडतात. अशी पार्श्‍वभूमी असल्याने एकदा दोनदा पकडले गेलेले गुटखा विक्रेते पुन्हा सक्रिय होतात त्यांना जरब बसण्यासाठी गुटखा बंदी कायदा कडक होणे आवश्यक आहे.

Tags : Konkan, illegal, gutka, selling,  district