Tue, Jul 16, 2019 01:54होमपेज › Konkan › कुडाळात अतिक्रमण हटाव मोहीम

कुडाळात अतिक्रमण हटाव मोहीम

Published On: Feb 01 2018 11:22PM | Last Updated: Feb 01 2018 9:39PM कुडाळ :  शहर वार्ताहर

कुडाळ नगरपंचायत प्रशासनाने शहरातील हायस्कूल ते जिजामाता चौक मुख्य रस्त्यालगतच्या शासकीय जागेतील अतिक्रमण गुरूवारी हटविले. मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्या उपस्थितीत ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. दरम्यान, शासकीय जागेतील अतिक्रमण हटविण्यात आले असून खासगी जागेतील हद्द निश्‍चित करून टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच ठेवणार असल्याची माहिती श्री. ढेकळे यांनी दिली. 

कुडाळ  शहरातून  जाणारा  वेंगुर्ले- मठ -पणदूर-घोडगे मार्गाचा टप्पा कुडाळ न.पं.ने सा.बां. विभागाकडून ताब्यात घेतला आहे. शहरात या रस्त्यालगत ठिकठिकाणी बांधकामे, स्टॉल्स,  दुकाने  अशा प्रकारचे अतिक्रमण करण्यात आले आहे. रस्त्यावरील  वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाचा मुद्दा वारंवार चर्चेत  येत असल्याने या  रस्त्यालगतच्या  स्टॉल्स व  दुकानधारकांना नोटिसा बजावून बेकायदेशीर बांधकाम व स्टॉल्स स्वतः हटविण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. या सूचनांचे बहुतांश स्टॉल्स धारकांनी  पालन करून स्वतः स्टॉल्स हटविले. 

मात्र, स्टॉल्सधारकांनी न हटविलेले स्टॉल्स, फलक न.पं. प्रशासनाने गुरूवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून हटविले. मुख्याधिकारी श्री. ढेकळे स्वतः या मोहीमेत रस्त्यावर  उतरले होते. न.पं.चे कर्मचारी, जेसीबी, ट्रॅक्टरचा या मोहिमेत सहभाग होता. सुरूवातीला काही स्टॉल्सधारकांनी मोहिमेला विरोध दर्शवत सीईओ श्री. ढेकळेंशी चर्चा केली. मात्र, श्री. ढेकळेंनी शासकीय जागेतील अतिक्रमण हटविणार अशी भूमिका घेत मोहीम सुरूच ठेवली. 

दरम्यान, मुख्याधिकारी श्री. ढेकळे यांनी गुरूवारी शासकीय सर्व्हे नंबरमधील अतिक्रमण हटाव पूर्ण झाले आहे. या रस्त्यालगत डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंत खासगी व शासकीय जागेची हद्द निश्‍चित करून  टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे तसेच पोलिस स्टेशन ते उद्यमनगर  या रस्त्यालगतचे  अतिक्रमण स्टॉल्स तातडीने हटविण्याबाबत सा.बां. विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगितले.