Mon, Jan 27, 2020 13:03होमपेज › Konkan › पिस्तूलच्या धाकाने इचलकरंजीच्या व्यापार्‍याला आंबोलीजवळ लुटले

पिस्तूलच्या धाकाने इचलकरंजीच्या व्यापार्‍याला आंबोलीजवळ लुटले

Published On: May 15 2019 1:52AM | Last Updated: May 14 2019 10:32PM

सावंतवाडी ः

पोलिस असल्याचे सांगून पिस्तूलचा धाक दाखवत कोल्हापूर - इचलकरंजी येथील एका कापड व्यापार्‍याला भर दिवसाढवळ्या आंबोली हद्दीतील आजरा रोडवर अज्ञात संशयितांनी लुटल्याची खळबळजनक घटना रविवारी सायंकाळी घडली.  

उमेश वसंतराव पिसे (रा. इचलकरंजी-चंदूर)  असे  व्यापार्‍याचे नाव आहे. त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याचा ऐवज मिळून एकूण 5 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल संशयितांनी जबरदस्तीने मारहाण करून काढून घेतला. 

मंगळवारी सकाळी या व्यापार्‍याला कर्नाटक-बेळगाव हद्दीतील चिरमुरी या गावी पहाटे 4 वाजता सोडून आलिशान स्कॉर्पिओ कारने पलायन केले.  याप्रकरणी  व्यापारी उमेश वसंतराव पिसे (रा. इचलकरंजी-चंदूर) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञातांविरोधात दरोडा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत माहिती अशी की, कोल्हापूर-इचलकरंजी येथील कापड व्यापारी उमेश वसंतराव पिसे  हे आपले दोन मित्र व चालक मिळून तिघांसमवेत गोवा येथे फिरायला गेले होते. रविवारी सायंकाळी ते  माघारी जात असताना आंबोली पोलिस हद्दीतील आजरा रोडवर आलिशान स्कॉर्पिओ कार घेऊन आलेल्या संशयितांनी फिर्यादींच्या कारला ओव्हरटेक करीत गाडी आडवी लावून थांबविली. आम्ही पोलिस आहोत. तुझ्याकडे तपास करायचा आहे.

 तू गाडीत बस, असे सांगून संशयितांनी पिसे यांना जबरदस्तीने कारमध्ये बसविले. त्यानंतर त्यांना बेळगाव येथे घेऊन जात अज्ञातस्थळी  बेदम मारहाण केली. व्यापारी पिसे यांच्याकडे असलेले 1 लाख 90 हजार रुपये रोख रक्कम, पाच सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे ब्रेसलेट, चेन, टायटनचे घड्याळ आदी मिळून एकूण 5 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला. त्यानंतर फिर्यादी यांना पहाटे बेळगाव हद्दीवरील चिरमुरी या गावी सोडून दिले व तेथून पलायन केले. या घटनेनंतर घाबरलेल्या फिर्यादी यांनी तेथीलच स्थानिकांच्या मोबाईलवरुन आपल्या नातेवाईकांना फोन केला. त्यानंतर नातेवाईकांनी कोल्हापूर जिल्हा पोलिस अधिक्षकांची तातडीने भेट घेऊन दरोड्याची माहिती दिली.  हा गुन्हा सिंधुदुर्ग पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे कोल्हापूर पोलीस अधिक्षक यांनी सिंधुदुर्गचे पोलिस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांना कल्पना दिली. त्यावरुन सकाळी 10 वा. आंबोली पोलिसांनी चिरमुरी येथे असलेले फिर्यादी यांना आणण्यासाठी धाव घेतली. याप्रकरणी फिर्यादी उमेश पिसे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात पाच अनोळखी इसमांवर  सशस्त्र दरोडा शस्त्र अधिनियम, मारहाण, अपहरण करुन लुटणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सायंकाळी सिंधुदुर्गचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक निमीत गोयल व कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्याला भेट दिली. 

उमेश वसंत पिसे हे आपले मित्र संदीप शेटके, यतीन पोरे, निरजंन स्वामी यांच्यासह गोवा येथे गेले होते. गोवा येथून इचलकरंजीच्या दिशेने ते रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आजरा रोड येथे आले असता अनोळखी स्कार्पिओतील इसमांनी पोलिस असल्याचे सांगत मला गाडीत घातले अशी फिर्याद दिली आहे.  या प्रकरणी पोलिस उपविभागीय अधिकारी व वरिष्ठांनी तातडीने येऊन चौकशी सुरू केली आहे, असे सांगण्यात आले.पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक भूषण मळगावकर व प्रमोद काळसेकर व अन्य तपास करत आहेत. यातील फिर्यादी यांचा इचलकरंजी येथे मोठा कपड्यांचा व्यवसाय आहे. तसेच फळांचे दुकान असून त्यांच्या मुलाची मेडीकल फार्मसी आहे.