होमपेज › Konkan › विरोधकांचे आव्हान स्वीकारले : खेराडे

विरोधकांचे आव्हान स्वीकारले : खेराडे

Published On: Feb 28 2018 1:15AM | Last Updated: Feb 27 2018 9:16PMपत्रकार परिषदेला आशिष खातू, स्वीकृत नगरसेवक विजय चितळे होते. नगराध्यक्षा सौ. खेराडे म्हणाल्या की, नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत शहर विकासाच्या द‍ृष्टीने आवश्यक निधी उभारण्यासाठी आम्ही शंभर कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाचे आश्‍वासन दिले होते. गेली पाच वर्षे चिपळूण न.प.चे अंदाजपत्रक पन्‍नास कोटींपर्यंत होते. मात्र, या वेळचे अंदाजपत्रक शंभर कोटींवर नेण्यात आले आहे. त्या नुसार शासनाकडून सुमारे 42 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. पैकी सुमारे 22 कोटी रुपये चिपळूण न.प.कडे आले आहेत. उर्वरित रक्‍कम शासनाच्या विविध योजनांच्या निधीतून उपलब्ध होणार आहे. 

या निधीतून शहरातील ‘डीपी’ व ‘टीपी’ योजनेअंतर्गत प्रस्तावित रस्ते विकसित केले जाणार आहेत. त्यासाठी संबंधित रस्त्यांच्या जागा मालकांसोबत नगररचना व संबंधित विभागातील तांत्रिक तज्ज्ञ यांची एक बैठक येत्या आठ दिवसांत घेतली जाणार आहे. त्या माध्यमातून रस्त्यांविषयी व संबंधित जागा मालकांच्या मोबदल्याविषयी योग्य तोडगा काढला जाणार आहे. त्याचबरोबर चिपळूण न.प. ते बहादूरशेख, शिवाजी चौक ते पॉवर हाऊस, महाराष्ट्र हायस्कूल ते स्वामी मठ आदी रस्ते रूंद करून दुभाजक व पदपथ निर्माण केला जाईल. शहरातील भटक्या व मोकाट गाढवांचा बंदोबस्त करण्यासाठी सांस्कृतिक केंद्रामध्ये कोंडवाडा उभारला जाणार आहे. 

सध्या शहराचा बांधकाम क्षेत्रात मोठा विकास सुरू आहे. मात्र, बांधकाम व्यावसायिकांकडून न.प. कडून दिल्या जाणार्‍या परवानगीचे उल्लंघन होत आहे. प्रामुख्याने संबंधित इमारतींचे सांडपाणी शुद्धीकरण व पुनर्वापर करणार्‍या छोट्या प्रकल्पाचे नियोजन होत नाही. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा हा गंभीर प्रश्‍न बनला आहे. त्याचा त्रास जनतेला होत आहे. लवकरच या विषयात संबंधित बांधकाम व्यावसायिक व इमारतींची पाहणी करून हे छोटे प्रकल्प संबंधितांकडून करून घेतले जातील. 

या संदर्भात चिपळूण न.प.च्या सभेमध्ये चर्चेसाठी विषय घेण्याकरिता काही नगरसेवकांनी विरोध दर्शविला. त्यामागचे कारण पाहता काहीजण बांधकाम व्यावसायिकांना ब्लॅकमेल करीत असल्याचे कानावर येत आहे. काहीवेळा प्रशासनाने दिलेल्या चुकीच्या परवानगीदेखील नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. प्रामुख्याने शहरातून जाणारा गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग शहरालगत अन्य बाजूने वळविण्यासाठी उक्‍ताड ते बहादूरशेख या परिसरात वाशिष्ठी नदीलगत संरक्षक भिंत बांधून पर्यायी मार्गाचे नियोजन करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. या बजेटमध्ये सर्व नगरसेवकांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची विकासकामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. बजेट संदर्भातील बैठकीत विरोधकांनी न.प.च्या ज्या कर रकमेत  कपात सुचवली आहे ती न.प.चे आर्थिक नुकसान करणारी असल्याचे सौ. खेराडे म्हणाल्या.