Thu, Apr 25, 2019 04:11होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : मळ्यात खवळे, आले खवळे

सिंधुदुर्ग : मळ्यात खवळे, आले खवळे

Published On: Jun 09 2018 7:51PM | Last Updated: Jun 09 2018 7:51PMआचरा :उदय बापर्डेकर

आचरा परिसरात शुक्रवारी दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने आचरा परिसराला चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे सखलभागात पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पावसाचा जोर वाढल्यान खवळे जातीच्या माशांना पकडण्यासाठी मत्स्यखवय्यांची धांदल उडाली आहे.

शुक्रवारपासून असलेल्या संततधार पावसाने आचरा परिसराला झोडपून काढलं आहे. दरम्यान खाडी किनाऱ्यालगतच्या परिसरात पाणी भरल्याने चढणीचे मासे मिळायला सुरुवात झाली आहे.  देवूळवाडी येथील मळे शेतीत डोंगरेवाडी इथून खाडीचे पाणी आतमध्ये शिरल्याने पाण्याबरोबर आलेल्या चढणीच्या खवळे जातीच्या माशांना पकडणयासाठी मत्स्यखवय्यांची गडबड उडाली.

 रामेश्वर मंदिरामागच्या या मळे शेतीचा  भाग मोठ्या पावसाने पुर्णत: पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या भागात खाडीच्या पाण्याबरोबर वाहत आलेले मासे, खेकडे पकडणाऱ्याची  एकच चंगळ उडाली होती. शुक्रवारीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागात पाणी भरल्याने चढणीचे खवळे मासे उसळी मारत वर येत असल्याचे काहींच्या दृष्टीस पडल्याने हाताला मिळेल त्या वस्तूने मासेमारी करण्याची गडबड ग्रामस्थांमध्ये दिसत होती. एकंदर मिरगाच्या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा देण्याबरोबरच चढणीच्या खवळे जातीच्या माशांमुळे मत्स्यखवय्यांची चांगलीच धांदल उडाली आहे.