Wed, Apr 24, 2019 01:43होमपेज › Konkan › काजू प्रक्रिया अनुदानासाठी महिला उद्योजकाचे उपोषण

काजू प्रक्रिया अनुदानासाठी महिला उद्योजकाचे उपोषण

Published On: Aug 17 2018 10:37PM | Last Updated: Aug 17 2018 8:33PMओरोस : प्रतिनिधी 

राज्य कृषी विभागामार्फत काजू प्रक्रिया उद्योजकांना प्रोत्साहित अनुदान देण्याची योजना राबवून प्रोत्साहित केले जाते. परंतु प्रत्यक्ष काजू प्रक्रिया व्यावसायिकांना त्रृटी काढत दोन वर्षे अनुदानापासून वंचीत ठेवल्याने कर्जाचे हप्तेही भरणे शक्य नसल्याप्रकरणी वेतोरे येथील गावडे काजूच्या जयश्री जनार्दन गावडे यांनी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. याबाबत त्रृटींची पुर्तता करकून अनुदान मिळावा व बँकेकडून  कर्ज वसुलीसाठी सक्‍ती करू नये याबाबत सूचना देत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सात दिवसांत प्रश्‍न निकाली काढण्याचे आश्‍वासन दिले. 

आपल्या कॅश्यू प्रक्रिया व्यवसायाकरिता अनुदान मिळावे अशी जयश्री गावडे यांची मागणी आहे. श्रीमती गावडे यांनी 2014 मध्ये काजू प्रक्रिया उद्योगासाठी  प्रस्ताव केला. 2014 मध्येच राज्य कृषी अधिक्षक सिंधुदुर्ग यांनी त्याला मान्यता दिली व अनुदान उपलब्धतेनुसार दिला जाईल असे सांगितले. कृषी विभागाच्या पूर्व संमतीचे हे  पत्र दाखवून त्यांनी बँकेचे 30 लाख कर्ज  घेतले. 10 लाख स्वः गुंतवणूक करून 40 लाखाचा काजू  प्रकल्प 2015-16 या आर्थिक वर्षात सुरू केला. कृषी अधिकार्‍यांनी प्रकल्पाची पाहणी करून 10 लाख अनुदान मिळविण्यासाठी शिफारस केली. परंतु आजपर्यंत त्यांना हे अनुदान मिळाले नाही. या उद्योगातून पंधरा महिलांना रोजगार दिला आहे. गेल्या दोन वर्षांत काजू बी चे वाढलेले दर,  निम्म्या किंमतीत येणारी परदेशी काजू बी बाजारात यामुळे काजू प्रक्रिया व्यवसाय मेटाकुटीला आला आहे. आजपर्यंत आपण दागिने गहाण ठेवून कसाबसा व्यवसाय सुरू ठेवला व बँकेचे कर्ज काही प्रमाणात फेडले. मात्र वरील समस्यांमुळे गेली काही महिने हप्ते थकले आहेत. परिणामी  बँकेने जप्तीची कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. जर शासनाचे अनुदान मिळाले नाही तर यापुढे व्यवसाय सुरू ठेवणे अशक्य आहे. सहाजिकच माझ्यासह कारखान्यात काम करणार्‍या महिलाही रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. यामुळे मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. 

माझ्यासह अनेक काजू व्यावसायिक तरूण अनुदानाची वाट पाहत आहेत. त्रृटी काढून उद्योजकांना त्रास देण्याचा प्रयत्न टाळावा यासाठी आपणाला उपोषण करावे लागत असल्याचे सौ. जयश्री गावडे यांनी सांगितले. याप्रश्‍नी राज्य कृषी अधीक्षक शेळके यांनी आपल्या त्रृटींची पुर्तता केली असून लवकरात लवकर अनुदान उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अनुदान उपलब्धतेबाबत पूर्तता करावी व संबंधित बँकेला जप्ती कारवाई थांबवा, असे आदेश दिले आहेत.