Sat, Aug 24, 2019 00:06होमपेज › Konkan › लोरेत सिलिका उत्खननप्रकरणी ग्रामस्थांचे उपोषण

लोरेत सिलिका उत्खननप्रकरणी ग्रामस्थांचे उपोषण

Published On: Apr 19 2018 10:43PM | Last Updated: Apr 19 2018 10:37PMकरंजे : वार्ताहर

लोरे नं.1. येथे सुरु असलेले सिलिका उत्खनन बेकायदेशीर असल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत शासनाला जाग आणण्यासाठी गुरुवार पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. सायंकाळी कणकवली तहसीलदार वैशाली माने व पोलिस निरिक्षक शशिकांत खोत यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली.

लोरे गावात एस्मो ट्रेडिंग कॉर्पोरेशन व सिंधुदुर्ग खनिज उद्योग असे दोन खनिज पट्टे असून त्यावर सन 1985सालापासून के. के. सुवर्णा यानी शेतकरी जमीन मालकांना कोणतीही पूर्व कल्पना न देता उत्खनन सुरु केले आहे. तसेच सदर जमीन मालकांना कुठल्याच  प्रकारचा मोबदला अद्याप दिला गेलेला नाही.  याबाबत  जिल्हा प्रशासन शासन दरबारी जमीन मालकांनी पत्रव्यवहार करूनही त्यांची दखल घेतली गेलेली नाही.तसेच वाळू काढून मोठमोठ्या खाणी बनल्या आहेत. अद्यापपर्यंत त्या बुजविल्या नसल्यान तात्काळ बुजविण्यात याव्यात अशी विविध समित्यांनी मागणी केली असता त्यावर जिल्हा प्रशासनाने कोणताच विचार केला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.   

या उपोषणात राकेश रावराणे, शांताराम राणे, चंद्रकांत राणे, प्रदीप गुरव, संतोष राणे, उत्तम राणे, महेश राणे, रमेश गुरव, संतोष रावराणे, भालचंद्र गुरव, विजय राणे, शंकर पेडणेकर, सुराम दुखंडे, योगेश रावराणे, जयंत रावराणे, प्रकाश पवार, कल्पेश राणे, उत्तम पेडणेकर, शशिकांत राणे व बाबू राणे  आदी सहभागी झाले आहेत.  घटना स्थळी सर्कल फोंडाघाटचे मंडलअधिकारी दिलिप पाटील यांनी भेट देवून उपोषणकर्त्यांची बाजू ऐकून घेतली.माजी कृषी सभापती तुळशीदास रावराणे यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.