Fri, Mar 22, 2019 22:58होमपेज › Konkan › अरुणा प्रकल्पग्रस्तांचे धरणस्थळी उपोषण

अरुणा प्रकल्पग्रस्तांचे धरणस्थळी उपोषण

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 03 2018 10:17PMवैभववाडी ः प्रतिनिधी

अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करून मोबदला वाटपाची 12/2 ची नोटीस प्रकल्पग्रस्तांच्या बळजबरीने माथी मारण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. याचा निषेध करण्यासाठी अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समिती आखवणे, भोम यांच्या वतीने प्रकल्पस्थळी अबालवृद्ध, गुराढोरांसह  सोमवारी सकाळपासून आंदोलन सुरू केले आहे. कोणत्याही परिस्थितीत नोटीस स्वीकारणार नाही, असा आक्रमक पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे.

अरुणा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणार्‍या आखवणे, भोम, नागपवाडी प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाटपाची 12/2  ची नोटीस 4 सप्टेंबर रोजी वाटप करण्याची तारीख प्रांताधिकार्‍यांनी जाहीर केली आहे. यापूर्वी दोन वेळा घाईगडबडीत नोटीस बजावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. प्रकल्पग्रस्तांनी त्यावेळी नोटीस नाकारली होती. अंतिम निवाड्यामध्ये अनेक चुका असून त्या दुरुस्त कराव्यात.  नोटीस वाटप करण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन याबाबत सविस्तर माहिती दयावी, अशी मागणी केली होती. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबीत मागण्याकडे दुर्लक्ष करीत प्रशासन मोबदला वाटपाची नोटीस प्रकल्पग्रस्तांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करीत आहे. याला प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध आहे. यासाठी सोमवारी सकाळपासूनच अबालवृध्दांसह, अगदी गुराढोरांसह प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. मंगळवारी नोटीस वाटप करण्यास येणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांना गावात प्रवेश करु देणार नाही. बळाचा वापर करुन नोटीस वाटण्याचा प्रयत्न केल्यास तो हानून पाडू. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला.  

आंदोलनात समिती अध्यक्ष रंगानाथ नागप, सचिव शिवाजी बांद्रे, वसंत नागप, शांतीनाथ गुरव, एकनाथ मोरे, विजय भालेकर,सुरेश नागप,विलास कदम,  यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त सहभागी झाले आहेत. रात्री उशीरापर्यंत हे आंदोलन सुरू होते.