Thu, Jun 27, 2019 14:23होमपेज › Konkan › डी.एड्., बी.एड्.धारकांचे १४ पासून उपोषण

डी.एड्., बी.एड्.धारकांचे १४ पासून उपोषण

Published On: May 12 2018 1:29AM | Last Updated: May 11 2018 8:45PMओरोस  : प्रतिनिधी

आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना 70 टक्के न्याय मिळण्यासाठी कोकणात वातावरण तापले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोर्चे काढल्यानंतर आता उपोषणाचा धडाका लावला जाणार आहे.सिंधुर्गात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 14, 15, 16 मे रोजी लाक्षणिक उपोषण करुन डी.एड.,बी.एड. बेरोजगार शासनाचे लक्ष वेधणार आहेत. 

शिक्षक भरतीत गुण वाढवून देणार्‍या रॅकेटवर कारवाई व्हावी, धोरणात्मक बदल करून आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना 70 टक्के आरक्षण मिळावे, जिल्हा बदल्यांमुळे येथील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी व येथील बेरोजगारी कमी करण्यासाठी स्थानिक डी.एड्. व बीएड् धारकांना शिक्षक भरतीत प्राधान्य मिळावे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे डोंगराळ असून भरतीत डोंगरी भागाला  आरक्षण मिळावे,विदर्भ-मराठवाड्यातील शिक्षकांचे पुनर्वसन कोकणात नको अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

शिक्षक भरती सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच गुण वाढवून देण्याच्या रॅकेटने राज्यभरात खळबळ उडाली आहे. सन 2010 प्रमाणे आताच्या भरतीतही गैरप्रकार घडत असून गुण वाढवून देण्याबाबतचे संभाषणही व्हायरल झाले आहे. या रॅकेटची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना 70 टक्के प्राधान्य देण्यात यावे. अन्यथा आम्ही परजिल्ह्यातील उमेदवारांना रूजू होवू देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

यापूर्वीही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मोर्चे काढण्यात आले होते. आता लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे संघटनेच्या शिष्टमंडळाने सांगितले.जिल्ह्यातील डी.एड., बी.एड. धारकांनी या तीन दिवशीय उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष भीवसेन मसुरकर, उपाध्यक्ष भाग्यश्री रेवडेकर, सचिव लखू खरवत, अतुल वाढोकार, भाग्यश्री नर, कृपाली शिंदे, सत्यम कदम, विभावरी परब यांनी केले आहे.