Thu, Mar 21, 2019 23:55
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आणखी किती बळी हवेत?

मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आणखी किती बळी हवेत?

Published On: Jul 26 2018 1:34AM | Last Updated: Jul 26 2018 1:34AMसावंतवाडी ः प्रतिनिधी

मराठ्यांच्या आंदोलनाचा ’पेड आंदोलन’ असा उल्लेख करणे म्हणजे समस्त मराठ्यांचा अपमान आहे. मराठा समाजाची नाराजी लक्षात घेता शासनाने तात्काळ योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन करीत शासन आणखी किती बळी जाण्याची वाट पाहत आहे? असा सवाल  सावंतवाडीचे नगराध्यक्ष  बबन साळगावकर यांनी केला. 

सकल मराठा सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित गुरुवार  26 जुलैच्या जिल्हा बंदला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. नगराध्यक्ष साळगावकर यांनी या आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली.  ते म्हणाले, तिहेरी तलाकच्या निर्णयाबाबत ज्याप्रमाणे शासनाला निर्णय घ्यावा लागला तशीच परिस्थिती आज मराठा समाजाच्या बाबतीत झाली आहे. समाजाची मागणी लक्षात घेता मराठ्यांना आरक्षण मिळणे काळाची गरज आहे.  28 जुलैला सिंधुदुर्ग सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग बंद आंदोलनाला आपला पाठिंबा आहे. मात्र, हे आंदोलन शांततेत व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 

ते म्हणाले, मराठ्यांचे आंदोलन ‘पेड’ होते असे सांगून काही लोकांनी या आंदोलनाची खिल्ली उडविली आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. एखादा समाज आपल्या समाजासाठी मागणी करीत असताना त्यांच्या आंदोलनाला नाव ठेवणे चुकीचे आहे. राजकीय लोकांकडून असे प्रकार होता नयेत, असे साळगावकर यांनी सांगितले.   काकासाहेब शिंदे, जगन्‍नाथ सोनावणे यांनी समाजाच्या मागण्यांसाठी बलिदान दिले आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी  शासनाला आणखी किती बळी हवेत? असा प्रश्‍न साळगावकर यांनी  केला.  आर्थिक निकषांच्या आधारे आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही. तसा निर्णय शासन घेत असेल तर त्याचा फायदा तळागाळातील सर्व धर्मियांना होणार आहे.  तसा निर्णय शासनाकडून देण्यात आल्यास निश्‍चितच आपण सकारात्मक राहू, असे साळगावकर यांनी सांगितले

आंदोलनाला जिल्ह्यातील विविध संघटनांचा पाठिंबा
सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग बंद आंदोलनाला जिल्ह्यातील विविध संघटांनी पाठींबा जाहीर केला आहे.  शेतकरी संघटना तसेच विठ्ठल रखुमाई लाकूड व्यापारी संघटनेच्यावतीने पाठिंबा व्यक्‍त करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी दिली. सिंधुदुर्ग स्वराज्य संघटनेनेही गुरुवारच्या सिंधुदुर्ग बंदला पाठिंबा व्यक्‍त केला असल्याचे स्वराज्य संघटनेचे अ‍ॅड. राजू कासकर यांनी सांगितले. सकल मराठा समाजाच्या उद्याच्या बंदला ऑटो रिक्षा सेना चालक- मालक संघटनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष भाऊ पाटील यांनी पाठिंबा व्यक्‍त केला आहे.