Mon, May 20, 2019 09:00होमपेज › Konkan › पाडलोस येथे आगीत घर बेचिराख

पाडलोस येथे आगीत घर बेचिराख

Published On: Jan 27 2018 11:22PM | Last Updated: Jan 27 2018 10:44PMमडुरा :  वार्ताहर

पाडलोस-बामणवाडी येथील रामचंद्र अमृत गावडे यांच्या घराला आग लागून आतील खेळण्यांच्या साहित्यासह सुमारे सहा लाखांचे नूकसान झाले.श्री.गावडे यांच्या घराजवळच चार फुट अंतरावर दुसरे घर असल्याने ग्रामस्थांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या बाजूची आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. ऐन जत्रोत्सवाच्या हंगामातच खेळणी जळाल्याने गावडे कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. श्री. गावडे आंगणेवाडी येथून घरी आल्यानंतर खेळणी साहित्यासह बेचिराख झालेले घर पाहून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.  

पाडलोस-बामणवाडी येथील रामचंद्र गावडे व त्यांचा मुलगा राघोबा गावडे हे आंगणेवाडी श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवास खेळण्यांचे दुकान लावण्यासाठी गेले होते. शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली. मध्यरात्रीची वेळ असल्यानेे घरातील माणसे झोपी गेली होती.आग लागल्याचे त्यांच्या लक्षात येईपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले.आगीच्या ज्वाळांचा भडका उडाल्याने घरावरील छप्पर जमीनदोस्त झाले. घरात खेळण्यांचे सुमारे एक लाख पन्नास हजारांचे साहित्य होते. तर वासे, कौले, रिपा तसेच अन्य घराचे साहित्य सुमारे चार लाख पन्नास हजार असे एकूण सहा लाखांचे नुकसान झाल्याचे श्री.गावडे यांनी सांगितले.

घराच्या मागच्या बाजूला रामचंद्र गावडे यांचे दुसरे घर आहे. त्या घरात रात्री सौ. रोशनी राघोबा गावडे व त्यांची मुले झोपली होती. जळालेल्या घराच्या मागील बाजूस आगीचा भडका उडाल्याने लगतच्या घराला धोका निर्माण झाला होता. परंतु ग्रामस्थ संतोष आंबेकर, राजन आंबेकर व बापू (इटू) गावडे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पाठिमागील आग विझविल्याने अनर्थ टळल्याचे अन्य ग्रामस्थांनी सांगितले.

आग विझविण्यासाठी शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, पाडलोस उपसरपंच महादेव गावडे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर परब, माजी उपसरपंच विजय कुडतरकर, अर्जुन गावडे, राजू माधव, प्रशांत माधव, उदय गावडे, रामकृष्ण गावडे, लक्ष्मण गावडे, विजय दिगंबर गावडे, पपी गावडे, भास्कर माधव, अर्जुन गंगाराम गावडे, चंद्रकांत पाडलोसकर, ग्रामपंचायत कर्मचारी लवु गावडे, चंद्रकांत गावडे, अमोल माधव, बाळासाहेब करमळकर आदी ग्रामस्थांनी बादली व पंपाच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे संपूर्ण घर बेचिराख झाले. पाडलोस पोलिस पाटील सौ.रश्मी माधव, कोतवाल नाना वेंगुर्लेकर, रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी घटनेची पाहणी केली.घरमालक श्री.गावडे यांनी कोणीतरी अज्ञाताने आग लावल्याचा संशय व्यक्‍त केला असून याबाबत पोलिसांत तक्रार देणार असल्याचे सांगितले.