होमपेज › Konkan › हॉटेल व्यावसायिकांचे उपोषण

हॉटेल व्यावसायिकांचे उपोषण

Published On: Mar 10 2018 11:02PM | Last Updated: Mar 10 2018 8:30PMरत्नागिरी : प्रतिनिधी

महानगरपालिका, नगरपालिका हद्दीतील महामार्गालगतची सर्व दारू दुकाने सुरू आहेत. पण ग्रामीण भागात ती अद्यापही बंद असून हा दुजाभाव का? याचा जाब विचारण्यासाठी तसेच शासनाच्या दुटप्पी धोरणाच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक 12 रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशातील महामार्गालगतची दारू दुकाने 1 एप्रिलपासून बंद करण्यात आली. त्यानंतर हॉटेल व्यावसायिकांनी याचिका दाखल करून दाद मागितली. त्यामुळे नगरपालिका हद्दीतील दारू दुकानांना परवानगी देण्यात आली. परंतु, ग्रामीण भागातील महामार्गालगतच्या दारू दुकाने व बारवर अद्यापही निर्बंध आहेत. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

आतापर्यंत अनेकवेळा दाद मागूनही शासन दाद देत नसल्याने त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक 12 रोजी लाक्षणिक उपोषण छेडणार आहेत. राज्यातील सर्व हॉटेल व्यावसायिक त्या-त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. हॉटेल प्रसाद येेथे गुरूवारी जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांची सभा झाली. या सभेमध्ये 12 रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून 12 मार्चच्या उपोषणात जिल्ह्यातील सर्व हॉटेल व्यावसायिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. आगामी काळात हा विषय चिघळण्याची चिन्हे आहेत.