Fri, Jan 24, 2020 23:48होमपेज › Konkan › होडेकर हल्‍लाप्रकरणी सहाजणांना पोलिस कोठडी

होडेकर हल्‍लाप्रकरणी सहाजणांना पोलिस कोठडी

Published On: Oct 21 2018 2:17AM | Last Updated: Oct 21 2018 2:17AMरत्नागिरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष उबेद होडेकर यांच्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या सहाजणांना न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी शहरालगतच्या उद्यमनगर ‘एमआयडीसी’तील नर्मदा सिमेंट कंपनीच्या मागील बाजूला स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष उबेद होडेकर यांच्यावर पिस्तुल रोखत धारदार तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी मुन्ना देसाई व बावा नाचणकर या दोघांना पोलिसांनी तत्काळ अटक केली होती.

त्यानंतर फरारी असलेल्या अल्ताफ संगमेश्‍वरी, विजय माने, अन्या वालम, हर्षल शिंदे, सिकंदर ऊर्फ काल्या खान आणि अभिजीत दुडे यांना शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली होती. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. पुढील तपासाच्या द‍ृष्टीने पिस्तुल, तीन तलवारी जप्‍त करण्याच्या असल्याने सहाजणांना पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती.

पोलिसांची मागणी न्यायालयाने मान्य करीत सहाही जणांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश कदम  उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.