होमपेज › Konkan › ‘हर हर महादेव’ च्या जयघोषाने दुमदुमली हिरण्यकेशी!

‘हर हर महादेव’ च्या जयघोषाने दुमदुमली हिरण्यकेशी!

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 13 2018 10:59PMआंबोली : वार्ताहर

आंबोली पर्यटनस्थळावरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री हिरण्यकेशी ‘हर हर महादेव’च्या गजराने दुमदुमूण गेले. शिवरात्री निमित्त हिरण्यकेशी तीर्थक्षेत्री हजारो भविकांनी पहाटेपासून गर्दी केली.पहाटे हिरण्यकेशी  शिवलिंगाची महापूजा आणि अभिषेक, आरती करण्यात आली. त्या नंतर भाविकांसाठी दर्शनाला सुरुवात झाली. पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केल्याने दिवसभर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. 

हिरण्यकेशी ही पूर्ववाहिनी नदी आहे. या नदीच्या उगमस्थानी स्वयंभू श्री शंकर महादेवाचे जागृत देवस्थान शिवलिंग स्वरुपात आहे. नदीचा उगम हा संथ प्रवाहाचा असून शिवलिंगाच्या बाजूने वाहत आहे.गुहेच्या मुखात पाण्यात शिव लिंग, नंदी, श्री गणेश व देवीची मूर्ती आहेत.तेथून हिरण्यकेशी नदीचा उगम असून बाजुलाच मोठी गुहाही आहे.श्रावण महिन्यात येथे श्रावणी सोमवारी हजारो भाविक पवित्र स्नान व दर्शनासाठी येथे गर्दी करतात. दरवर्षी लाखो पर्यटक व भाविक हिरण्यकेशी या तीर्थक्षेत्राला भेट देतात.तसेच येथील निसर्ग सुंदर परिसर,शुद्ध हवा व भक्तीमय प्रसन्न वातावरण यामुळे येथे अद्भूत शक्‍तीची जाण होते. 

महाशिवरात्रीनिमित्त मुंबई,पुणेसह पश्‍चिम महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथील शिवभक्‍तांनी दर्शनासाठी गर्दी केली. अभिषेक करणे, नवस फेडणे,श्रीफळ अर्पण करणे, ओटी भरणे आदी धार्मिक विधींसाठीही भाविकांची गर्दी दिसून येत होती. तीर्थकुंडात स्नान करण्यासाठी ही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  हिरण्यकेशी नदी उगम स्थानापासून काही अंतरावर असलेल्या राघवेश्‍वर येथील स्वयंभू गणपती मंदिर येथेही भाविकांनी दर्शन घेतले. ग्रामस्थांकडून महाशिवरात्रीनिमित्त हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र येथे चोख नियोजन केले होते.त्यामुळे भाविकांना गैरसोय झाली नाही.