Mon, Mar 25, 2019 17:26होमपेज › Konkan › महामार्गावर ‘कार्पेट’ न घातल्यास तीव्र आंदोलन

महामार्गावर ‘कार्पेट’ न घातल्यास तीव्र आंदोलन

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 07 2017 9:24PM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका मंजूर झालेल्या ठेकेदार कंपनीवर चौपदरीकरण होईपर्यंत महामार्गाच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी आहे.  असे असताना केवळ तात्पुर्ती मलमपट्टी करून महामार्गावरील खड्डे भरण्यात आले आहेत. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ठेकेदार कंपनीने काही जणांना फॉर्च्युनर, इनोव्हा गाड्या देऊन त्यांची तोंडे बंद करण्यापेक्षा महामार्गावर 
कार्पेट घालून रस्ता सुस्थितीत करावा. येत्या 10 जानेवारीपर्यंत खारेपाटण ते झाराप यादरम्यान महामार्गावर कार्पेट न घातल्यास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी दिला. 

महाराष्ट्र स्वाभिमानच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जि. प. सदस्य संदेश सावंत, स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत उपस्थित होते. दत्ता सामंत म्हणाले, महामार्ग प्रकल्पग्रस्तांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा यासाठी कणकवलीसह सर्व प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आहे. प्रकल्पग्रस्तांना आम्ही निश्‍चितपणे न्याय मिळवून देऊ. अनेक ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळाला नसताना काही लोकांना फॉर्च्युनर, इनोव्हा गाड्या काँन्ट्रॅक्टरने दिल्या आहेत. तसे करण्यापेक्षा  काँन्ट्रॅक्टरने चांगले काम करावे. जनतेलाच महामार्गावरून सुरक्षित आणि चांगल्यारितीने प्रवास करता येईल अशा पध्दतीने रस्त्याचे काम करावे. महाराष्ट्र स्वाभिमानचा या कामावर अतिशय बारकाईने लक्ष असणार आहे. कणकवलीकरांच्या मोर्चाला स्वाभिमानचा पाठिंबा आहे. यापुढे प्रकल्पग्रस्त जी आंदोलने करतील त्यामध्ये आमचा सहभाग असेल. प्रकल्पग्रस्तांना वार्‍यावर सोडू देणार नाही असे श्री. सामंत म्हणाले. 

ते पुढे म्हणाले, पालकमंत्र्यांची कालची भेट ही स्थानिक मच्छीमारांसाठी नव्हती तर परराज्यातील ट्रॉलर्स धारकांची व्यवस्था पाहण्यासाठी ते गेले होते. त्यांचा प्रशासनावर अजिबात वचक नाही. केवळ घोषणा देण्यापलीकडे त्यांनी काही केले नाही. पालकमंत्र्यांनी हिंमत असेल तर रमेश गोवेकर बेपत्ता प्रकरणाचा छडा लावून दाखवावा अन्यथा राजीनामा द्यावा असे आव्हान सतिश सावंत यांनी दिले.