Thu, Jan 17, 2019 02:11होमपेज › Konkan › हेवाळे बनले धूरमुक्त गाव!  

हेवाळे बनले धूरमुक्त गाव!  

Published On: Mar 03 2018 1:48AM | Last Updated: Mar 02 2018 11:07PMदोडामार्ग : प्रतिनिधी

हत्तीबधित गाव असूनही वन संवर्धनासाठी हेवाळे ग्रामचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उद्गार जिल्हा उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी काढले. गतवर्षी संत वनग्राम स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावणार्‍या स्मार्ट ग्राम हेवाळेची वनव्यवस्थापन समिती अंतर्गत झालेल्या वन संवर्धन कार्याचे मुल्यांकन  7 मार्चला राज्यस्तरीय समिती करणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर व  हेवाळे वनव्यवस्थापन समिती अंतर्गत गावातील पात्र लाभार्थ्यांना एलपीजी स्वयंपाक गॅस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. 

स्मार्ट ग्राम हेवाळेने बुधवारी संपूर्ण गाव धूरमुक्त करण्याचा उद्देश पूर्ण केला. वनव्यवस्थापन समिती अंतर्गत गावातील पात्र 25 कुटुंबाना स्वयंपाक गॅस वितरण बुधवारी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सरपंच तथा वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप देसाई, सचिव तथा वनपाल दत्ताराम देसाई यांसह मान्यवर व समिती सदस्य, लाभार्थी उपस्थित होते. हेवाळे ग्रामने वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून यापूर्वी 80 कुटुंबाना सवलतीच्या दरात एलपीजी  गॅस, तर पशुपालकांना बायोगॅस व गावातील प्रत्येक कुटुंबाला धूरमुक्त निर्धुर चुलींचे वाटप केले आहे. बुधवारी उर्वरित सर्व कुटुंबाना  एलपीजी गॅस वाटप करून गाव खर्‍या अर्थाने धूरमुक्त बनला. भविष्यात नव्याने नोंद होणार्‍या कुटुंबाना सुद्धा सवलतीच्या दरातील एलपीजी स्वयंपाक गॅस वाटप करण्यासाठी प्रयन्त असल्याचे सरपंच संदीप देसाई यांनी सांगितलेे.  

7  रोजी मूल्यांकनसन 2016-17 च्या संत वनग्राम जिल्हास्तरीय स्पर्धेत हेवाळे गावाने प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या  या गावाची 7 मार्च रोजी राज्यस्तरीय समितीकडून तपासणी होणार आहे. या पार्शवभूमीवर उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी हेवाळे ग्रामला भेट देत  वनव्यवस्थापन समिती व ग्रामवासीयांना मार्गदर्शन केले. सरपंच संदीप देसाई यांच्याकडून उपवनसंरक्षक चव्हाण यांनी समितीच्या कामकाजाबाबत व आगामी नियोजनाबाबत आढावा घेतला. समितीच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी  राज्यस्तरीय मूल्यांकनाबाबत काही टिप्स दिल्या. सर्व ग्रामवासीयांच्या साथीने हे इंद्रधनुष्य सुद्धा आम्ही लीलया पेलू ,असा विश्‍वास सरपंच संदीप देसाई यांनी व्यक्त केला आहे.