Tue, Apr 23, 2019 00:29होमपेज › Konkan › नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी ‘हेलिपॅड’

नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी ‘हेलिपॅड’

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 8:43PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

अतिवृष्टी काळात निर्माण होणार्‍या संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. संभाव्य धोकादायक ठिकाणी विशेषतः किनारी भागात काळजीपूर्वक देखरेख ठेवून आपत्तीचा इशारा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘बल्क एसएमएस’ प्रणाली अधिक प्रभावीपणे राबवावी. तसेच  दुर्गम भागात तातडीने मदत पोहोचविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात  हेलिपॅडची जागा निश्‍चित करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.

यंदा मान्सून चांगला असल्याचे संकेत वेधशाळेकडून वर्तवण्यात आले आहेत. तसेच जून आणि जुलै या कालावधीत सर्वाधिक दिवस किनारी भागात उधाणाचे असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यात पावसाळ्यात उद्भवणार्‍या संभाव्य आपत्तीमध्ये तातडीची मदत निवारण कार्य राबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यात आपत्ती व्यस्थापन यंत्रणा सज्ज केली आहे. पूर प्रवण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारे लाईफ जॅकेट, रबर बोट, सर्च लाईट, मेगा फोन, तंबू, दोर, विजेरी, होंडा पंप, इलेक्ट्रिक जनरेटर, फायर सूट, फोल्डिंग स्ट्रेचर, प्रथम उपचार पेटी इत्यादी अत्यावश्यक साधने उपलब्ध असल्याची जिल्हानिहाय माहिती देण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित, वित्त आणि पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रशासकीय सुसज्जता करण्यात  आली आहे. सर्व तालुक्यांचे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष अद्ययावत ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. धोका प्रवण क्षेत्रात काळजीपूर्वक देखरेख ठेवून आपत्तीचा इशारा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामुहिक संदेश वहनयंत्रणा राबवण्यात येणार आहे. यासाठी ‘बल्क एसएमएस’ प्रणाली प्रभावीपणे राबवण्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सूचित केले आहे.

नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पीडितांना ताबडतोब मदत मिळेल यासाठी प्रशासकीय यंत्रणेने तत्पर राहणे आवश्यक आहे. अतिवृष्टीच्या काळात कित्येकदा वीज प्रवाह खंडित होऊन जनजीवन विस्कळीत होते. यासाठी पर्यायी विजेची व्यवस्था तयार ठेवण्याचे सूचित करण्यात आले आहे. मदत आणि बचाव कार्यात अडसर निर्माण होणार नसल्याने आपत्कालीन वीज व्यवस्था तत्पर करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. गरजूंना वैद्यकीय मदत, खाद्य पदार्थांचा पुरवठा, पिण्याचे पाणी, कपडे, दळणवळण पूर्व स्थितीत आणणे तसेच आर्थिक किंवा वस्तू रुपातील मदतीच्या वाटपाबाबत अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये तत्परता आणण्यासाठी प्रत्येक तालुक्यात हेलिपॅडची जागा निश्‍चित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हेलिपॅडच्या जागांची निवड करून तशी हंगामी तजवीज करण्यात येणार आहे. जागा उपलब्ध नसल्यास शाळेचे पटांगण अथवा शासकीय कार्यालयाची  रिकामी जागा निवड करून नियोजन करावे, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.