Wed, Jun 26, 2019 11:25होमपेज › Konkan › चिपळूण : पंधरागाव भागात बेसुमार वृक्षतोड

चिपळूण : पंधरागाव भागात बेसुमार वृक्षतोड

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 16 2018 10:12PMचिपळूण : प्रतिनिधी

खेड तालुक्यातील पंधरागाव भागामध्ये खासगी व संरक्षित क्षेत्रात बेसुमार जंगलतोड होत असून बिनदिक्‍कत वाहतूकही परजिल्ह्यात होत आहे. वन्यसंपदेबरोबरच वन्यजीव संपदाही या लाकूड माफियांमुळे धोक्यात आली असून वन विभागाच्या दुर्लक्षामुळे संताप व्यक्‍त होत आहे.

पंधरागाव भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. शिवाय या भागातील निवे, चोरवणे हा भाग ‘बफर झोन’ मध्ये येतो. वर्षानुवर्षे सातत्याने या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत असते व येथून रात्रीचे ट्रक भरून परजिल्ह्यांकडे कुंभार्ली मार्गे जात असतात. संरक्षित क्षेत्रामध्ये जंगलतोड करण्याचे परवाने मिळत नसल्याने येथील लाकूड व्यापारी संरक्षित बाहेरील भागांचे जंगलतोडीचे परवाने तयार करून त्याचा उपयोग संरक्षित क्षेत्रातील लाकूड वाहतुकीसाठी होत असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. या विभागातून दिवसा वीस ते पंचवीस ट्रक लाकूड बिनदिक्‍कतपणे परजिल्ह्यांत पाठविले जात आहे. 

आंबडस व खोपी येथेही वन खात्याचे तपासणी नाके असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाकूड वाहतूक होत असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. नवीन तोडीचा परवाना 650 रु. तर जुने लाकूड पास परवाना 150 रु. असा आहे. तरीही नवीन लाकूडही जुन्या तोडीच्या परवान्यावर ही बिनदिक्‍कत वाहतूक सुरू आहे. निवे, चोरवणे या पट्ट्यामध्ये बफर झोन आहे व या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वन्यसंपदा व तेथे वन्यजीवांची संख्याही फार मोठी आहे. शेकडो लाकूडतोड कामगार या भागात दिवस-रात्र काम करीत आहेत. त्यामुळे वन्यजीवनही संकटात आले आहे. संरक्षित क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणावर जंगलतोड सुरू आहे. पर्यावरणाचा हा एकप्रकारचा र्‍हास आहे. याबाबत सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यायचे निश्‍चित केले असून दि. 21 एप्रिल रोजी पालकमंत्री रवींद्र वायकर व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबईत भेट घेतली जाणार आहे. 

कोकणाची वन्यसंपदा सर्वच नियमांना हरताळ फासत होत असून पुढील काही काळात जंगले उद्ध्वस्त करण्याचा विडाच लाकूड माफियांनी उचलल्याचे दिसून येते. या भागात अनेक लाकूड व्यापारी वनखात्याच्या अधिकार्‍यांशी संगनमत असल्यानेच एवढी जंगलतोड व वाहतूक होत असावी, असा आरोप ग्रामस्थांतून होत आहे.

... तर लाकूड वाहतूक रोखणार
पंधरागाव विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या वन्यसंपदा व वन्यजीवांचा र्‍हास करण्याचा विडा लाकूड माफियांनी उचलला आहे. यामुळे जंगल उतारावर मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जंगलात खोलवर लाकूड वाहतुकीसाठी रस्ते बनविले गेले आहेत. नियमांना हरताळ फासत वृक्षांचीही कत्तल होत आहे. सामाजिक संघटना या विरोधात सरकारकडे दाद मागणार असून शासनाने या जंगलतोडीवर निर्बंध न घातल्यास लाकूड वाहतूक रोखण्याचा इशारा सामाजिक संस्था व ग्रामस्थांनी दिला आहे.