Fri, Jan 24, 2020 22:26होमपेज › Konkan › जिल्ह्यात धुवाँधार; जनजीवन विस्कळीत 

जिल्ह्यात धुवाँधार; जनजीवन विस्कळीत 

Published On: Jul 01 2019 1:11AM | Last Updated: Jun 30 2019 10:46PM
कणकवली : प्रतिनिधी

जूनचा पाऊण महिना वाट पाहायला लावणार्‍या पावसाने अखेरच्या तीन दिवसांत  तुफान फटकेबाजी केली. शनिवारी रात्रीपासून रविवारी दिवसभर झालेल्या धुवाँधार पावसाने सिंधुदुर्गात जनजीवन विस्कळीत झाले. कणकवलीत महामार्ग ठेकेदार कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे मुख्य नाला तुंबून नजीकच्या रामेश्‍वर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यात पाणी घुसले तर तहसील कचेरी ते कणकवली कॉलेजकडे जाणारा रस्ताही जलमय झाला. सिंधुदुर्गातील अनेक कॉजवे आणि मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोर्‍यात झालेल्या धुवाँधार पावसामुळे अनेक कॉजवे आणि रस्त्यांवर पाणी येऊन वाहतुकीवर परिणाम झाला. तर, भुईबावडा आणि करूळ घाटात दरडी कोसळून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 

शनिवारी रात्रीपासून पावसाने जोरदारपणे बरसण्यास सुरुवात केली. रात्रभर सरीवर सरी कोसळत होत्या. रविवारी दिवसभर अजिबात उसंत न घेता पाऊस बरसतच होता. या धुवाँधार पावसामुळे गडनदी,
 जानवली, भंगसाळ, कर्ली, पिठढवळ, तेरेखोलसह अनेक लहान मोठ्या नद्यांना पूर आले होते. कणकवलीत गडनदीवरील सर्वच केटी बंधारे पाण्याखाली गेले होते. ग्रामीण भागातही लहान-मोठ्या कॉजवेवर पाणी आले होते. 

हायवेच्या निकृष्ट कामांचा पोलखोल

या धुवाँधार पावसाचा फटका बसला तो कणकवलीकरांना. महामार्ग ठेकेदार कंपनीच्या नियोजनशून्य कामामुळे अ‍ॅड. उमेश सावंत यांच्या घरानजीकच्या नाल्यावरील  मोरी अरूंद केल्याने आणि पुढे गोकुळधाम हॉटेलनजीक पाण्याचा प्रवाह ब्लॉक झाल्याने अर्ध्या कणकवलीचे पाणी तुंबले. हे पाणी रामेश्‍वर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यासह परिसरात घुसले. सारस्वत बँकेसह एटीएम आणि दुकानातही पाणी गेले. रहिवाशांनी पार्क केलेल्या कार आणि मोटरसायकल पाण्याखाली गेल्या. माजी आ. विजय सावंत यांच्या बंगल्यातही पाणी शिरले. तसेच याच नाल्याचे पाणी तुंबल्याने कणकवली तहसील ते कॉलेजकडे जाणारा विद्यानगर मार्ग जलमय झाला. परिणामी रस्ताही बंद झाला. याचा मोठा फटका कणकवलीकरांना बसला. नगरसेवक अबिद नाईक, नायब तहसीलदार आर. जे. पवार, अ‍ॅड. उमेश सावंत, माजी जि. प. सदस्या सुगंधा दळवी आणि रामेश्‍वर प्लाझातील रहिवाशी सकाळपासूनच हायवे ठेकेदाराच्या प्रतिनिधींशी आणि अधिकार्‍यांशी संपर्क साधत होते. यामुळे काहीकाळ महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. चार तासानंतर 11.30 वा. हायवे ठेकेदाराने जेसीबी पाठवला आणि ब्लॉक झालेले गटार मोकळे करण्यात आले. ठेकेदाराच्या या ढिसाळ कारभाराबाबत कणकवलीकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. कणकवली सा. बां. कार्यालयानजीक सर्व्हीस रोड वाहून गेला तर शासकीय विश्रामगृहाची ठेकेदाराने बांधून दिलेली संरक्षक भिंत जमिनदोस्त झाली. यामुळे ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा पोलखोल झाला आहे. 

कलमठ-कलेश्‍वर मार्गावर पाणी

कलमठ-कलेश्‍वर मंदिरकडे जाणार्‍या रस्त्यावर पाणी आले. तेथील दोन व्यावसायिक इमारतींच्या बांधकामावर झालेल्या भरावामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह खंडित झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे त्या भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय झाली. कलमठ ग्रा. पं. सदस्य राजू राठोड यांनी याबाबत तहसीलदारांचे लक्ष वेधल्यानंतर प्रभारी तहसीलदार आर. जे. पवार, तलाठी श्री. निग्रे यांनी पंचनामा केला. 

जिल्ह्यातील अनेक मार्ग पाण्याखाली

कणकवली-आचरा मार्गावर वरवडे-फणसवाडी येथे पाणी आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वागदेनजीक सातरल-कासरल मार्गावर पाणी आल्याने असरोंडी, मालवण पोईपकडे जाणारा मार्ग बंद होता. या मार्गावरील वाहतूक कासरल बांव मार्गे सुरू करण्यात आली होती. सकाळी 11.30 च्या सुमारास होडावडा पुलावर पाणी आले होते. माणगाव खोर्‍यातही धुवाँधार पाऊस झाल्याने या भागातील अनेक लहान मोठे कॉजवे आणि रस्ते पाण्याखाली गेले होते. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटला होता. सायंकाळी पाऊस ओसरल्यानंतर परिस्थिती पूर्ववत झाली. गेल्या 24 तासात सिंधुदुर्गात सरासरी 129.375 मि.मी. पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 829.905 मि.मी. पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यातील सर्व धबधबे प्रवाहित 

गेल्या दोन दिवस झालेल्या धुवाँधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धबधबे प्रवाहित झाले आहेत. पहिल्याच रविवारी आंबोली, कणकवली तालुक्यातील सावडाव धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. याशिवाय दोडामार्ग तालुक्यातील मांगेली, देवगड तालुक्यातील व्याघ्रेश्‍वर, वैभववाडीतील नापणेसह अनेक लहान मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे आता पर्यटकांना खर्‍या अर्थाने वर्षा पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.