Thu, Jan 23, 2020 05:35होमपेज › Konkan › रत्नागिरी जिल्ह्यात दम‘धार’!

रत्नागिरी जिल्ह्यात दम‘धार’!

Published On: Jun 30 2019 1:08AM | Last Updated: Jun 30 2019 1:08AM
रत्नागिरी : प्रतिनिधी

आगामी चार दिवस कोकणात मुसळधार पाऊस होणार असून त्याला ताशी वेगाने 120 कि.मी. वाहणार्‍या वार्‍याची साथ राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात  सावधगिरीचा इशारा सर्व यंत्रणांनी दिला आहे.. शनिवारी दिवसभरात 112. 44 मि.मी.च्या सरासरीने 1012 मि. मी. पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात 579 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. एकूणच शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस पडला.

संगमेश्‍वर-देवरुख व साखरपा-देवरुख  या मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत  झाल्याची घटना शनिवारी घडली. तसेच सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. विशेषकरून किनारी भागात सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, पर्यटनीयद‍ृष्ट्या  महत्त्वाच्या किनारे बंद करण्यात आले आहेत. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात रुसलेला मोसमी पाऊस या आठवड्यात सक्रिय झाला आहे. गेल्या तीन दिवसांत पावसाने साडेतीनशे मि. मी.ची मजल मारली आहे. या तीन दिवसांत पावसाने जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत तीन हजार मि.मी. एकूण पल्‍ला गाठला आहे. गेले दोन दिवस पावसाने सातत्य दाखवताना काही भागात जोरदार वाटचाल सुरू ठेवली. 

दरम्यान, गेल्या दोन दिवसात पावसामुळे रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शिळ, दापोलीतील पंचनदी आणि राजापूर तालुक्यातील अर्जुना ही धरणे तुडुंब भरली आहेत. शुक्रवारी दिवसभरात सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात नोंदविला तर सर्वात कमी पर्जन्यमान दापोली तालुक्यात नोंदविले. मंडणगड 172, खेड 85, दापोली 60, गुहागर 100, चिपळूण 147, संगमेश्‍वर 88, रत्नागिरी 86, लांजा 82, आणि राजापूर तालुक्यात सर्वाधिक 192 मि. मी पावसाची नोंद झाली. मोसमी पाऊस सक्रीय झाल्यानंतर बहुतांश सर्व तालुके  पावसाने व्यापले असून गेल्या आठवडाभरात पावसाने किरकोळ पडझड करीत अनेक भागात हानी केली. यामध्ये दापोली, खेड आणि गुहागर तालुक्यात पावसामुळे घराची आणि मालमत्तांची हानी झाली. चिपळूण तालुकयात तीन संरक्षक भिंती कोसळल्या असून एका घराचे अंशतः नुकसान झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाने नोंदविली आहे. 

आगामी चार दिवस कोकणात ताशी वेगाने 120 कि. मी. वाहणार्‍या वार्‍याच्या साथीने पाऊस होणार आहे. कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ने वर्तविला आहे.  त्यामुळे प्रशासनांनी किनारी भागात सावधगिरी बाळगताना कोकणातील किनार्‍यावर पर्यटकांना मज्जाव करण्याची तयारी केली आहे.  तशा सूचना जल्हा प्रशासनाने किनारी सुरक्षा आणि आपत्ती नियंत्रण यंत्रणेला केल्या आहेत.

किनारे पर्यटकांसाठी बंद

पालघर  जिल्ह्यातील जिल्ह्यातील मांडवा, एडवण, केळवा, माहीम, शिरगाव, सातपाडी, बोर्डी, घोलवड, चिंचणी, झाई-बोरीगाव, डहाणू, राजोडी,  रायगड जिल्ह्यातील अलिबाग, आक्षी, नागाव, मुरुड-एकदरा, मुरुड जंजिरा, काशिद बीच, श्रीवर्धन बीच, हरिहरेश्‍वर, दिवेआगर व किहीम किनारा, रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, आरेवारे, मालगुंड, गुहागर तर  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली हे किनार मुसळधार पावसाच्या शक्यत्येमुळेे सुरक्षिततेच्या द‍ृष्टीने पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत.