Thu, Apr 25, 2019 05:59होमपेज › Konkan › जिल्ह्याला अवकाळीचा फटका

जिल्ह्याला अवकाळीचा फटका

Published On: May 13 2018 2:15AM | Last Updated: May 12 2018 11:07PMरत्नागिरी : प्रतिनिधी

वेधशाळेच्या अंदाजानुसार शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरणातच जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळीचा जोरदार फटका बसला तर काही भागात शिडकावा झाला. गेेले दोन दिवस कमालीच्या बदललेल्या वातावरणात उन्हाचा दाह नसला तरी तापमानात उकाडा जाणवत आहे. जिल्ह्यात रत्नागिरी तालुक्यासह लांजा आणि राजापूर तालुक्यांत अवकाळीच्या जोरदार सरी झाल्या. दरम्यान, आगामी 48 तास मळभी वातावरणात पाऊस पडण्याची  शक्यता कुलबा वेधशाळेने वर्तविली आहे.

कोकणात 6 डिसेंबर 2017  रोजी ओेखी वादळाचा तडाखा बसला होता. त्यानंतर सलग पाच महिने अवकाळीचे सावट जिल्ह्यावर होते.  बदलेल्या वातावरणाने कोकणातील वातावरणाच्या नियमिततेत झालेले बदल आंबा हंगामाला मारक ठरले आहेत. या वातावरणाचा फटका आंब्याला बसला असून अनेक भागात उत्पादनात घट झाल्याची बागायतदारांची कैफियत आता पुढे येत आहे.

शुक्रवारी जिल्ह्यात मळभी वातावरणात अवकाळी पाऊस झाला. हेच सातत्य शनिवारीही कायम राहण्याची अटकळ हवामान विभागाने हवाई संदेशाद्वारे बांधली होती. ती खरी ठरली. शनिवारी जिल्ह्यात पावस, हर्चे, डोर्ले, सापुचेतळे, नेवरे, गणपतीपुळे, मालगुंड आदी ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी शहरासह कुवारबाव मिरजोळे आदी ग्रामीण भागातही अवकाळी पावसाची उपस्थिती होती. पावस पंचक्रोशीत अनेक भागात पहाटे 5 पासून  जोरदार पावसाने हजेरी लावली. 

लांजाच्या ग्रामीण भागासह शहरी भागात पाऊस झाला. राजापूर तालुक्यात नगरपरिषद हद्दीसह जवाहरचौक आणि अन्य परिसरात हलका पाऊस  झाला. संगमेश्‍वर आणि चिपळुणातही दिवसभर मळभी वाावरण होते. संगमेश्‍वरच्या  डोंगराळ भागाने व्यापलेल्या दक्षिण पट्ट्यातही अवकाळीने हलका फेर धरला होता. वळवाच्या पावसाचे सातत्य असलेल्या या भागात शनिवारी अवकाळीचा तासभर वावर होता. 

दरम्यान, रविवारीही वेधशाळेने ढगाळ वातावरणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहेे. आगामी 48 तास पावसाचे सावट कोकण किनारपट्टी राहणार असल्याचा अंदाच कुलाबा वेधशाळनेने वर्तविला आहे. मळभी वातावरणात दिवसभर ढगाळ  वातावरणाचे सावट जिल्हाभर असतानाच उकाड्यातही वाढ झाली.