Mon, Jun 17, 2019 04:22होमपेज › Konkan › सावधगिरीचा इशारा; आगामी तीन दिवस कोकणात अतिवृष्टी

सावधगिरीचा इशारा; आगामी तीन दिवस कोकणात अतिवृष्टी

Published On: Aug 27 2018 10:15PM | Last Updated: Aug 27 2018 10:15PMरत्नागिरी: प्रतिनिधी

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टी भागात आगामी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे.  पाऊस हंगामातील वातावरणाचा हा प्रभाव दहीकाल्यापर्यंत म्हणजेच 3 सप्टेंबरपर्यंत राहणार असल्याने किनारपट्टी भागात सावधगिरीचा  इशारा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी दिला आहे.

पाऊस हंगामाच्या तिसर्‍या प्रमुख महिन्यात पावसाने सातत्य ठेवले आहे.  श्रावण महिना सुरू झाल्यानंतर कोकणात श्रावण सरींनी जोर धरला आहे. मध्यंतरी पावसाचा जोर ओसरलेला होता. मात्र, त्यानंतर ऑगस्टच्या दुसर्‍या पंधरवड्यात पावसाने संततधार सुरूच ठेवली होती.  आतापर्यंत जिल्ह्यात पावसाने तीन हजारांची सरासरी ओलांडताना एकूण 28 हजार 224 मि. मी.ची मजल गाठली आहे. दरम्यान 27 पासून 3 सप्टेंबरपर्यंत  मुसळधार पावसाची  शक्यता ‘आयएमडी’ने वर्तविली आहे. 

सोमवारी जिल्ह्यात 29 मि. मी.च्या सरासरीने 261 मि. मी. पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पाऊस खेड आणि दापोली तालुक्यांत झाला. या तालुक्यात अनुक्रमे 53 आणि 42 मि. मी. पावसाची नोंद झाली.  मंडणगडमध्ये 22, गुहागर 23, चिपळूण 29, संगमेश्‍वर 40, लांजा 26, राजापूर तालुक्यात 16 मि. मी. पावसाची नोंद झाली. सर्वात कमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात केवळ 10 मि. मी. झाला. गतवर्षी याच कालावधीत पावसाने 2600 मि. मी.ची सरासरी  मजल गाठली होती. मात्र, यंदा पावसाने 500 मि. मी.ची आघाडी कायम राखली आहे. 

दरम्यान, आगामी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा ‘आयएमडी’ने दिला आहे. राज्याच्या अन्य विभागांपैकी कोकण विभागाला अतिवृष्टीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्याद‍ृष्टीने प्रशासनांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.  या कालावधीत  किनारी गावांनी सावधगिरी बाळगावी, अशी सूचना  जिल्हा प्रशासनाने केली आहे.