होमपेज › Konkan › मालवणात मुसळधार पर्जन्यवृष्टी

मालवणात मुसळधार पर्जन्यवृष्टी

Published On: Dec 06 2017 1:45AM | Last Updated: Dec 05 2017 10:59PM

बुकमार्क करा

मालवण :  वार्ताहर 

दक्षिणेकडे घोंघावत असलेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम आजच्या तिसर्‍या दिवशीही किनारपट्टी भागात कायम आहे. मंगळवारी पहाटे सोसाट्याच्या वार्‍यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमारांसह, नागरिकांचीही तारांबळ उडाली. सोमवारी येथील समुद्रात बुडालेली सिंधु-5 ही गस्तीनौका दुपारी पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर किनार्‍यावर आणण्यात स्थानिक मच्छीमार, सागरी तसेच स्थानिक पोलिस कर्मचार्‍यांना यश आले. 

सोमवारी रात्रीपासून पुन्हा समुद्राच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. समुद्राच्या अजस्त्र लाटा बंधार्‍यावरून आत घुसत असल्याचे चित्र किनारपट्टी भागात होते. पहाटेपासूनच सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस कोसळला.  सायंकाळी उशिरापर्यंत अधूनमधून पाऊस पडत होता. दिवसभर शहर परिसरात ढगाळ वातावरण कायम होते. 

मंगळवारी सकाळपासूनच समुद्राला मोठी भरती होती. सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊसही कोसळत असल्याने मच्छीमारांना तसेच पोलिस कर्मचार्‍यांना बुडालेली नौका बाहेर काढताना समस्या भासत होती. त्यामुळे 10 वाजल्यापासून गस्तीनौका समुद्रात उभी करून ती बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. ही नौका सरळ करण्यासाठी अविनाश खडपकर, योगेश पांचाळ या स्कुबा डायव्हर्सची मदत घेण्यात आली. पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही गस्तीनौका किनार्‍यावर आणण्यात यश आले. जेसीबीच्या साह्याने नौका बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली. 
समुद्राच्या उधाणामुळे तोंडवळी- तळाशील येथील कोळीदेव व तेरेकर रापण संघाची जाळी, दोरी, शिसे समुद्रात वाहून गेल्याने साडे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. तोंडवळी येथील गणेश रेवंडकर व गोविंद पेडणेकर यांनी किनार्‍यावर वाळत घातलेली खटवी वाहून गेल्याने सुमारे 50  हजार रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा वायंगणी तलाठी एम. एस. मनेर, त्रिंबक तलाठी बी. डी. नेरकर, कर्मचारी हरिश्‍चंद्र घाडीगावकर यांनी केला. देवबाग मोबारेश्‍वर मंदिर जवळ मच्छीमारांनी किनार्‍यावर सुरक्षित ठेवलेली जाळी काल रात्री समुद्रात वाहून गेली. दाजी कुमठेकर, श्याम कुमठेकर, उत्तम राऊळ, विशाल धुरी, रमेश धुरी यांच्यासह अन्य 20  जणांची जाळी समुद्रात वाहून गेल्याने आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री देवबाग सांताक्रूझवाडी आणि मोर्वेकरवाडीत समुद्री लाटांचे पाणी घुसले होते. दुपारनंतर उधाणाचा जोर ओसरला होता. मात्र वार्यासह पावसाच्या किरकोळ सरी कोसळत होत्या. शहरातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली होती.