Tue, Jul 16, 2019 22:31होमपेज › Konkan › मालवण तालुक्यात वादळी वार्‍यासह पाऊस

मालवण तालुक्यात वादळी वार्‍यासह पाऊस

Published On: Jun 02 2018 11:13PM | Last Updated: Jun 02 2018 10:31PMमालवण : वार्ताहर

मालवण तालुक्यात शुक्रवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे वीज कोसळल्याने महावितरणची सेवा कोलमडली.यामुळे  खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे शुक्रवारी व शनिवारी मालवण तालुका काळोखात गेला होता. आनंदव्हाळ, साळकुंभा परिसरात सुमारे दहा ते बारा वीज खांबांवर विजेचे लोळ कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती वीज वितरण विभागाने दिली असून विजेचे लोळ वीज खांबांवर कोसळल्याने वीज वितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, वीज खांबावर वीज कोसळून शुक्रवारी रात्रौ खंडित झालेला वीज पुरवठा तब्बल 20 तासांनी शनिवारी सायंकाळी सुरू झाला.

मालवणमध्ये शुक्रवारी रात्री 8.30 वा.च्या सुमारास मेघगर्जना व विजांच्या लखलखाटासह आलेल्या पावसाने महावितरणची सेवा कोलमडून गेली.पाळशी कातवड,आनंदव्हाळ, साळकुंभा परिसरात माळरानावर असलेल्या महावितरण कंपनीच्या सुमारे दहा ते बारा वीज खांबांवर विजेचे लोळ कोसळल्याने काही वीज खांब कोलमडून पडले तर काही वाकले. या प्रकारात वीज वितरणचे इन्सुलेटर जळाल्याने तसेच वीज खांब वाकल्याने वीज पुरवठा खंडित झाला. याच भागातून विरण आणि कुडाळ फिडरवरुन मालवण शहर व तालुक्याला वीज पुरवठा केला जातो. आनंदव्हाळ, साळकुंभा परिसरात वीज खांबांवरच वीज पडल्याने संपूर्ण मालवण तालुका काल रात्रौपासून अंधारात बुडून गेला होता. 

कुडाळ येथून 132 केव्हीच्या विद्युत वाहिनीद्वारे शहराला वीज पुरवठा होतो. कुडाळ ते मालवण या 30 किमी. अंतरावर ही वीजवाहिनी टाकण्यात आली असून धामापूरच्या डोंगरातून ही वीजवाहिनी जाते. पावसाळ्यात सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे या वीज वाहिनीवर झाडे कोसळण्याच्या घटना घडतात. जी गत कुडाळ फिडरची तीच गत विरण फिडरची. विरण-मालवण लाईनवरून वीज पुरवठा होतानाही वीज वितरण कर्मचार्‍यांना याच अडचणींना सामोरे जावे लागते. याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे मत काही ग्राहकांनी व्यक्‍त केले आहे. 

काल रात्रौ आनंदव्हाळ, साळकुंभा परिसरात 5 ठिकाणी कोसळलेल्या विजेच्या लोळांमुळे विजेचे खांब वाकले तर वीज वाहिन्या तुटून पडल्या. यात इन्सुलेटरचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वीज वितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर मालवण वीज विचारांचे सहाय्यक अभियंता योगेश खेर यांनी काल रात्रीपासूनच कनिष्ठ अभियंता गुरुदास भुजबळ, वायरमन अरुण फोंडेकर, दिगंबर मातले, सुनील वस्त, अमोल गोडे यांच्यासोबत आनंदव्हाळ, साळकुंभा भागाची पाहणी करून वीज पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली.