Mon, Jul 22, 2019 00:36होमपेज › Konkan › आचरा जामडुल बेटावर लोकवस्तीत शिरले पाणी 

आचरा जामडुल बेटावर लोकवस्तीत शिरले पाणी 

Published On: Dec 06 2017 1:45AM | Last Updated: Dec 05 2017 11:01PM

बुकमार्क करा

आचरा : वार्ताहर

समुद्राच्या उधाणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने आचरा जामडुल बेटावरील भरवस्तीत उधाणाचे पाणी घरांमध्येही पाणी शिरले होते. उधाणाचा जोर 2 तासांपेक्षा जास्त होता. गाऊडवाडी पिरावाडीला जोडणार्‍या बंधाराकम रस्त्यावर पाणी आल्याने काही काळ आचरा पिरावाडीचा संपर्क तुटला होता. वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता. ग्रामस्थ भीतीपोटी आपली घरे सोडून रस्त्यावर आले होते. पिरावाडी, जामडुल, हिर्लेवाडी या किनारपट्टीलगतच्या भागात काही ग्रामस्थांच्या माड, सुपारी बागेत पाणी शिरल्याने तसेच खारे पाणी विहिरीत गेल्याने पिण्याचे पाणी दूषित झाले. तर तोंडवळी तळाशिल येथील एका रापणसंघाची जाळी वाहून गेल्याने सुमारे 5 लाखांचे नुकसान झाले. या आपत्कालीन स्थितीत प्रशासकीय यंत्रणा प्रभावी न दिसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्‍त केली जात आहे. 
सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास उधाणाचे पाणी वाढू लागल्याने आचरा पिरावाडी-जामडुल येथील ग्रामस्थ, मच्छीमारांची तारांबळ उडाली होती. काही क्षणातच आचरा जामडुल बेट जलमय झाले. 12 वाजण्याच्या सुमारास घरांमध्ये पाणी शिरले. यावेळी भयभीत झालेल्या महिलांसह मुलांनी रस्त्यावर धाव घेत सुरक्षित स्थळी आसरा घेतला. यावेळी युसुफ शेख, हमीद शेख, नरेश आचरेकर, प्रमोद वाडेकर, दिवाकर आचरेकर, उत्तम गावकर, भानुदास मालंडकर, गुणाजी कुबल यांच्या घरात पाणी शिरले होते. तर जि. प. सदस्य जेरोन फर्नांडिस, दत्तात्रय बापर्डेकर, कमलाकर पांगे, लक्ष्मण पांगे, तानाजी पांगे, राजन गावकर, अशोक वस्ते यांच्या माडबागायतीमध्ये खारे पाणी शिरल्याने नुकसान झाले.