होमपेज › Konkan › सावंतवाडीला वळिवाचा तडाखा

सावंतवाडीला वळिवाचा तडाखा

Published On: May 11 2018 1:38AM | Last Updated: May 10 2018 11:41PMसावंतवाडी : शहर वार्ताहर

गेले काही दिवस उन्हाने होरपळून काढल्यानंतर गुरुवारी दुपारनंतर वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या या पावसाने सावंतवाडी तालुक्याच्या अनेक भागांना झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. सावंतवाडी शहरातील भालेकर हॉटेलवर झाड पडून हॉटेलचे नुकसान झाले. 

कोलगावमध्ये अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडली. तालुक्याच्या अनेक भागांत झाडे उन्मळून पडली, तर अनेक भागांतील वीज गायब झाली होती.बुधवारी रात्री तालुक्याच्या काही भागांत पाऊस पडला होता.गुरुवारी दुपारी 5 वाजेपर्यंत उष्णतेचा पारा वाढत असतानाच त्यानंतर पुढच्या तासाभरात अचानक वातावरण बदलले. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी करून जोराचे वादळ सुटले आणि काही वेळातच धो धो पावसाला सुरुवात झाली. शहरासह तालुक्यातील काही भागांत गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. जोरदार वार्‍यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. तब्बल अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ पाऊस पडला. 

सह्याद्रीच्या पट्ट्यात पावसाचा मोठा जोर होता. मळगाव, निरवडे, तळवडे, मळेवाड परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, तर सावंतवाडी शहरालाही या वळीवाच्या पावसाने झोडपून काढले. या पावसाने शहरातील गटारे तुंबून पाणी रस्त्यावर आल्याने पालिकेच्या नियोजनावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले.मुसळधार पावसासोबतच तुफानी वारे व विजांचा कडकडात सुरू असल्याने भीतीचे वातावरण होते. मात्र, नुकसान झाल्याचे वृत्त नव्हते.सहयाद्रीच्या भागात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जोरदार पावसाने वीज तसेच दूरध्वनी सेवा खंडित झाली होती.

अचानक झालेल्या या मुसळधार पावसाने शेवटच्या टप्प्यातील काजू पीक तसेच आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मे महिन्यात सर्वत्र लगिनघाई सुरू असताना अचानक येणार्‍या पावसामुळे नागरिकांसमोर मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे.