Sat, Aug 24, 2019 23:15होमपेज › Konkan › जनआक्रोश आंदोलन पाचव्या दिवशीही सुरुच

जनआक्रोश आंदोलन पाचव्या दिवशीही सुरुच

Published On: Mar 25 2018 1:49AM | Last Updated: Mar 24 2018 11:46PMदोडामार्ग : प्रतिनिधी

तालुकावासीयांनी आरोग्याच्या विविध मागण्यांसाठी केलेले बेमुदत आंदोलन शनिवारी पाचव्या दिवशी सुरुच होते, दरम्यान  भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आंदोलनस्थळी भेट देवून गोवा सरकारने जर 28 मार्चपर्यंत रूग्ण शुल्क घेणे बंद केले नाही तर गोव्यात जाणारे तिलारी धरणाचे पाणी बंद करू, यात आम्ही अग्रभागी राहू अशी ग्वाही दिली. 

तहसील कार्यालयासमोर गेले पाच दिवस तालुकावासीय हजारोंच्या संख्येने आरोग्याच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी बेमुदत आंदोलनाला बसले आहेत.जोवर ठोस निर्णय मिळत नाही. तोवर आंदोलन मागे घेणार नाही. किंबहुना आमरण उपोषण सुरू केले जाणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे आंदोलन सुरू होते. गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोजा यांची जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार,प्रदेश चिटणीस राजन तेली, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जि.प.सदस्य राजेंद्र म्हापसेकर, पं.स.सदस्य बाळा नाईक, उपाध्यक्ष शंकर देसाई यांच्यासह भेट घेतली. 

या भेटीत जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी गोव्यात रुग्णशुल्क फी घेतली जात असल्याने सिंधुदुर्गवासियांना प्रचंड आर्थिक त्रास होत आहे. महाराष्ट्र सरकारने जिल्हयातील रूग्णांसाठी येणारा खर्च गोवा शासनाला विम्यापोटी देण्याचे मान्य केले. या अनुषंगाने विधानसभेच्या सभागृहात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणविस यांनी घोषणा केली आहे. तोपर्यंत मोफत सेवा देण्यात यावी, अशी विनंती केली. याबाबत उपमुख्यमंत्री डिसोजा सकारात्मक असून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अमेरिकेत प्रकृती ठिक नसल्याने उपचार घेत आहेत. त्यांच्याशी याबाबत फोनद्वारे बोलून सर्व हकीकत मांडली जाईल,असे श्री.जठार यांनी आंदोलकांना सांगितले.यावेळी त्यांनी शिष्टमंडळाला गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सीस डिसोजा यांनी दिलेले लेखी पत्र आंदोलनस्थळी दिलेे.

गोवा सरकारने जर पूर्वीप्रमाणे मोफत सेवा देण्यासाठी 28 मार्चपर्यंत निर्णय घेतला नाही, तर गोव्यात जाणारे तिलारी धरणाचे पाणी अडवून ठेवू, यासाठी भाजपा ताकदीनिशी दोडामार्गवासीयांच्या पाठिशी असेल, असे आश्‍वासन त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. तोपर्यंत तुमचे बेमुदत आंदोलन सुरुच ठेवा, असे देखील त्यांनी भेटीदरम्यान सूचित केले. मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांची सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,खा.विनायक राऊत,पालकमंत्री दीपक केसरकर, आ.वैभव नाईक यांच्यासमवेत भेट घेतील,आणि यावर तोडगा काढण्यासाठी सरकारवर दबाब आणतील,असे जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत सांगितले.शिवसेना कायम दोडामार्गवासीयांंच्या पाठिशी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख बाबुराव धुरी उपस्थित होते. शनिवारी दिवसभरात माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांनी आंदोलनाला भेट देत पाठिंबा दिला.

 

Tags : Dodamarg, Dodamarg news, health demands, protest,