Sat, Jan 19, 2019 15:54होमपेज › Konkan › आरोग्यसेवेसाठी ‘आक्रोश’

आरोग्यसेवेसाठी ‘आक्रोश’

Published On: Mar 20 2018 10:50PM | Last Updated: Mar 20 2018 10:50PMदोडामार्ग : प्रतिनिधी

दोडामार्ग तालुक्यातील पाच हजारापेक्षा जास्त तालुकावासीय आरोग्याच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी एकत्रित आले. सिद्धिविनायक मंदिर ते तहसीलपर्यंत रॅलीतून नागरिकांच्या एकजुटीचे दर्शन यावेळी दिसले. जोवर ठोस निर्णय सर्व मागण्यांवर होत नाही, तोवर बेमुदत आंदोलन मागे घेणार नसल्याचे संयोजकांनी सांगितले. बुधवारपासून आणखीन नागरिक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तालुक्यात प्रथमच हजारोंच्या संख्येने तालुक्यातील जनतेने आपल्या न्याय हक्‍कांसाठी एकत्रित येऊन एकजुटीचे दर्शन सर्वांना घडविले.

‘आरोग्याचा जनआक्रोश’ या मथळ्याखाली तालुक्यातील अनेकांनी एकत्रित येत दिवस- रात्र जागून हे आंदोलन उभे केले आहे. गावोगावी जनजागृती करून मंगळवारी (दि.20) बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनाला तालुक्यातील प्रत्येक गावातून प्रचंड प्रतिसाद लाभला. प्रत्येकाशी निगडित असलेल्या आरोग्याविषयी तालुकावासीय हजारोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. 

  ...तर आम्ही गोव्याचे नाक दाबू : आ. नितेश राणे

आ. नितेश राणे यांनी संध्याकाळी आंदोलनाला भेट देत पाठिंबा दर्शविला  ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हा अस्मितेचा प्रश्‍न आहे. गोवा सरकारने जो रुग्ण शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला तो खेदजनक आहे. जर गोवा आम्हाला दाबत असेल तर आम्ही देखील काही कमी नाही, नाक दाबून गोव्यात जाणारे, दूध, भाजीपाला, पाणी बंद करू, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. गुरुवारी सकाळी अधिवेशनात प्रश्‍न मांडून आपल्या सरकारचे लक्ष वेधून तातडीने निर्णय घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.