होमपेज › Konkan › विंचू , सर्पदंशातून वाचवण्यात आरोग्य विभागाला यश

विंचू , सर्पदंशातून वाचवण्यात आरोग्य विभागाला यश

Published On: Jul 09 2018 1:03AM | Last Updated: Jul 08 2018 8:53PMचिपळूण : प्रतिनिधी

ग्रामीण भागात उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या ऋतुंमध्ये सरपटणार्‍या प्राण्यांकडून दंश करण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबरच मोकाट कुत्र्यांच्या दंशामुळे अनेकजण जायबंदी होतात. चिपळूण तालुक्यात 2017-18 मध्ये 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आकडेवारीनुसार विंचूने 1 हजार 362 जणांना डंख मारून घायाळ केले. तर 632 जणांना कुत्र्याने चावा आणि 183 जणांना सर्पदंश झाला आहे. मात्र, यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

ग्रामीण भागात उष्ण तापमानात विंचू दंशाचे प्रमाण अधिक असते. शेतकरी शेतात काम करताना सरपटणार्‍या प्राण्यांचे दंश होण्याची शक्यता जास्त असते. तर पावसाळ्यात सर्पदंश होऊन कित्येक जणांचे प्राण गेले आहेत. मात्र, आता आरोग्य विभागामार्फत औषधोपचार उपलब्ध असल्याने मृत्यूचे प्रमाण नगण्य झाले आहे. 

तालुक्यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्रात रामपूरमध्ये कुत्रा चावणे 127, सर्प 26, विंचू 130, कापरे केंद्रात कुत्रा चावणे14, सर्प 5 तर विंचू 118, खरवतेमध्ये कुत्रा चावणे 44, सर्प 7 तर विंचू 59, दादर केंद्रात कुत्रा चावणे 62, सर्प 28 तर विंचूदंश 501, शिरगावमध्ये कुत्रा चावणे 84, सर्प 32 तर विंचू 177, अडरेमध्ये कुत्रा चावणे 46, सर्प 10 तर विंचू 158, सावर्डे केंद्रात कुत्रा चावणे 128, सर्प 53 तर विंचू 73, फुरूस केंद्रात कुत्रा चावणे 10, सर्पदंश 4 तर विंचू 17 आणि वहाळ आरोग्य केंद्रामध्ये कुत्रा चावणे 117, सर्प 18 तर 112 विंचूदंश झाला आहे.

तालुक्यात 2017-18 या कालावधीत एकूण कुत्रा चावणे 632, सर्पदंश 183 तर 1 हजार 362 विंचूदंश अशी नोंद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार प्राप्त झाली आहे. सर्वात जास्त विंचूदंश दादर प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली आहे. तर फुरूस केंद्रात सर्वात कमी सर्पदंश झाल्याची नोंद आहे. मात्र, यामध्ये मृत्यूचे प्रमाण शून्य असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. आता प्रत्येक आरोग्य केंद्रात दंश झालेल्या रूग्णांवर शासनाकडून औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन शासन करते.

मात्र, आजही ग्रामीण भागात साप किंवा विंचू चावल्यानंतर मांत्रिकाकडे जाणारे अनेकजण आहेत. अंगारा व मंत्र टाकून विष उतरण्याचे प्रकार ग्रामीण भागात घडतात. त्यामुळे दंश झालेल्या व्यक्तीचा जीव गमावण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे अशा दंश प्रकारात लगेचच आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन चिपळूण आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.