Tue, May 21, 2019 13:07होमपेज › Konkan › हर्णैतील हत्येप्रकरणी २६ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल

हर्णैतील हत्येप्रकरणी २६ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल

Published On: Aug 19 2018 11:05PM | Last Updated: Aug 19 2018 10:32PMदापोली : वार्ताहर

तालुक्यातील हर्णै येथील इम्तियाज मेमन या वाळू व्यावसायिकाची जमावाकडून हत्या झाल्याचा प्रकार घडला. या नंतर मेमन यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, हर्णैतील सहाजणांसह अन्य वीसजणांवर खुनाचा गुन्हा दापोली पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. हर्णै परिसरात अजूनही तणावाचे वातावरण आहे.

या बाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हाणामारीत हत्या झालेल्या इम्तियाज मेमन याची पत्नी सादिया मेमन यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पती इम्तियाज मेमन यांचा वाळूचा व्यवसाय होता. त्यांनी नवीन घेतलेली नॅनो गाडी आपली सवत रेश्मा मेमन हिला दाखवण्यासाठी दि. 17 रोजी राहत मंझिल येथे गेले होते. माजीद महालदार याने पती इम्तियाज मेमन यांना फोनवरून शिवीगाळ केली. तेव्हा रेश्मा मेमन हिने माजीद महालदार याला फोन करून माझ्या नवर्‍याला शिवीगाळ का करतोस, असे विचारले होते. तसेच माजीद महालदारच्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून दोघे घरी आले होते. दि. 18 रोजी इम्तियाज मेमन राहत मंझिल, मेमन कॉलनी येथे घरी असताना शनिवारी दुपारी 3.30 च्या सुमारास हर्णै येथील माजीद महालदार, अस्लम खान, वाजीद खान, जुहुर मौलाना, अनिस मेमन, अफ्तार मेमन या संशयितांसह 20 ते 25 अन्य लोक आपल्या नवर्‍याला ठार मारण्याच्या इराद्याने लोखंडी पाईप, लाकडी दांडा, काठ्या घेऊन आपल्या घरी येऊन आले.

यावेळी या सर्वांनी इम्तियाज यांना शिविगाळ करत मारहाण केली. घराची काच फोडून नुकसान केले. आपल्या पतीच्या पाठीवर, पायावर, डोक्यावर लोखंडी पाईप व दांडक्याने या सर्वांनी जबर मारहाण करून  मारूती गाडीची काच देखील फोडली. आपण भांडण सोडवण्यासाठी गेले असता आपल्यालाही मारहाण केली. तसेच आपले दोन तोळ्यांचे सोन्याचे  मंगळसूत्र वाजीद खान यांनी तोडून फेकून दिले. तसेच माझी रेश्मा मेमन हिला शिविगाळ करून सासू फातिमा मेमन हिलाही धक्‍काबुक्‍की केली. त्यानंतर आपले पती इम्तियाज मेमन यांचे हातपाय बांधून पोलिस ठाण्यात घेऊन जातो, असे सांगून त्यांना ठार मारल्याचे सादिया मेमन यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

दरम्यान, दापोली पोलिसांनी सादिया मेमन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार  माजीद महालदार, अस्लम खान, वाजीद खान, जुहुर मौलाना, अनिस मेमन, अफ्तार मेमन यांच्यासह अन्य 20 संशयितांवर संगनमताने जमाव करून खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अनिल लाड अधिक तपास करीत आहेत.दरम्यान, रविवारी दुपारी मेमन कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला. सायंकाळी दफनविधी पार पडला.