Thu, Dec 12, 2019 09:02होमपेज › Konkan › ‘हापूस’ अद्यापही वधारलेलाच!

‘हापूस’ अद्यापही वधारलेलाच!

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 18 2018 10:01PMविजयदुर्ग : वार्ताहर

रसाळ चव म्हणून प्रसिद्ध असणारा कोकणातील हापूस हा सर्वांनाच प्रिय आहे. यासाठी देवगड हापूस आंबा प्रसिद्ध असून खायला गोडी लावणारा हा फळांचा राजा अद्यापही वधारलेल्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहे.गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी आंब्याचे उत्पादन फारच कमी आले असून यामुळे  देवगड हापूस आंबा मार्केटपर्यत पोहचायला उशीरा सुरू झाला.

सर्वसाधारणपणे मुंबई मार्केटला पहिल्या टप्प्यात आंबा  मोठ्या प्रमाणात पाठवला जातो. अजूनही वाशी मार्केटला आंब्याच्या एका पेटीचा दर हा 2700 पासून 3500 रूपये स्थिर आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा वाशी मार्केटला जात आहे. यामुळे अजून खासगी आंबा विकण्यास आंबा बागायतदारांनी  म्हणावी तशी सुरूवात केलेली नाही.यावर्षी मार्च मध्ये पडलेल्या पावसामुळे काही प्रमाणात आंबा पीकाला फटका बसल्याने सुरवातीच्या आंबा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. यामुळे  आंबा काही प्रमाणात खराब निघण्याची भीती असल्याने अनेकांनी खासगी आंबा न विकता मार्केटलाच पाठवण्याकडे कल ठेवला. तर काही व्यापारी वर्गाकडून या महिन्यापासून पुणे, कोल्हापूर, बेळगाव, गोवा याठिकाणीसुद्धा आंबा विक्रीसाठी पाठवला आहे. सध्या कोल्हापूर येथे 2 डझन आंब्यासाठी 1200 ते 1500 दर मिळत आहे तर पुणे येथे 1 डझन आंब्याचा दर हा 800 रूपयांपासून 1200 रूपयांपर्यंत आहे. तसेच पायरीचा दर हा 500 रूपयांपासून ते 700 रूपयांपर्यंत आहे.गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी केशर,पायरी या आंब्याचे उत्पादन फारच कमी आलेे आहे.

सध्या खासगी गाड्यांमधून आंबा मुंबईला पाठवायचा झाल्यास 120 रू.पासून 300रू.पर्यंत दर आकारला जात आहे. यामुळे नातेवाईकांना देखील आंबा पाठवणे कठीण झाले आहे. विजयदुर्ग, देवगड, कुणकेश्‍वर याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने अनेकांनी पर्यटन ठिकाणी आंबा स्टॉल लावणे पसंद केले आहे. यामुळे याठिकाणी येणार्‍या पर्यटकांना आंबा साधारण 400 ते 500 रूपये डझन दरात मिळत  आहे. सध्या सागरी माहामार्गावर अनेक ठिकाणी आंब्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत. हापूस प्रमाणेच बीटकीही चांगल्या भावाने विकली जात आहे. वाढत्या माहागाईत जर दर चांगले टिकून राहीले तरच आंबा बागायदार खर्चाच्या गणितातून सुटू शकेल,असे चित्र आहे.