Thu, Jan 17, 2019 20:45होमपेज › Konkan › आवक घटल्याने ‘हापूस’ला वाढता भाव

आवक घटल्याने ‘हापूस’ला वाढता भाव

Published On: Feb 28 2018 1:15AM | Last Updated: Feb 27 2018 9:08PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणातून दररोज सातशे ते आठशे पेटी आंबा सरासरी वाशीला जात होता. ओखी वादळामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात आलेला मोहर मोठ्या प्रमाणात गळून गेला. त्यानंतर वाढलेल्या थंडीमुळे 
पुनर्मोहराचे संकट बागायतदारांपुढे होते. पावसाने लवकर विश्रांती घेतल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात मोहर आला होता. त्याचे प्रमाणही चांगले होते. हा आनंद जास्त काळ टिकला नाही. ओखीने त्यावर पाणी 
फेरले. ऑक्टोबर महिन्यात आलेल्या मोहरातून प्रमाणापेक्षा कमी उत्पादन मिळाले. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात वाशी बाजारात जाणार्‍या हापूसच्या मालावरही परिणाम झाला आहे. सुरवातीला सुमारे आठशे पेटी आंबा जात होता. गेल्या चार ते पाच दिवसांत हे प्रमाण घटले असून आता फक्‍त सरासरी तीनशे पेट्याच जात आहेत. 

सुरवातीला पेटीचा दर तीन हजार ते सहा हजार रुपयांपर्यंत मिळत होता. आवक घटल्याने त्यात पाचशे रुपयांनी वाढ झाल्याचे वाशीतील व्यापार्‍यांकडून सांगण्यात आले. आता नोव्हेंबर महिन्यातील फुटव्यातून येणार्‍या उत्पादनावर मार्चमधील आवक अवलंबून राहणार आहे. हापूसला केरळ आणि कर्नाटकी आंब्याचे दरवर्षी आव्हान असते. 

ओखी वादळामुळे केरळाला मोठा फटका बसला आहे. तेथे अ‍ॅन्थ्रॉक्सनोजचा प्रादुर्भाव झाल्याने फळावर काळे डाग पडले आहेत. तेथून दर्जेदार आंबा येण्याचे प्रमाण कमी असेल असा अंदाज वर्तविला जात आहे. ऐन हंगामामध्ये हापूसचा दर कायम ठेवणे शक्य होईल, असे बागायतदारांकडून सांगितले जात आहे. 

10 एप्रिलनंतरच वाशी मार्केट

मध्ये हापूससह अन्य प्रकारचे आंबे मुबलक प्रमाणात बाजारात दाखल होतील. त्यावेळी दर घसरतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. स्थानिक बाजारात बागायतदारांना चांगला दर मिळत असेल तर निर्यातीवर भर दिला जात नाही. उत्पादन कमी असल्याने निर्यातीत घट होईल, अशी भीती व्यक्‍त केली जात आहे.