Tue, May 21, 2019 00:04होमपेज › Konkan › महिलांच्याच हाती महिलांचे भवितव्य

महिलांच्याच हाती महिलांचे भवितव्य

Published On: Apr 08 2018 10:41PM | Last Updated: Apr 08 2018 9:36PMगुहागर : मनोज बावधनकर

गुहागर नगर पंचायतीची निवडणूक रंगतदार होणार असून नऊ जागांसाठी तब्बल 27 महिला निवडणूक रिंगणात आहेत. आरक्षित नऊ जागांसह अन्य दोन प्रभागात महिलाच उमेदवार रिंगणात आहेत. गुहागरातील 3,073 महिला मतदार असून यापैकी महिलांच्या बाजूने किती उभ्या राहतात हा प्रश्‍न असून महिला मतदारांमध्ये देखील निवडणुकीच्या निमित्ताने उत्साह निर्माण झाला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्‍नास टक्के आरक्षण मिळाल्यानंतर ग्रामपंचायत, नगर परिषद, जि. प. व  पं. स. निवडणुकांमध्ये निम्म्याहून अधिक ठिकाणी महिला उमेदवार निवडणूक लढवित आहेत. याच पद्धतीने गुहागर नगर पंचायत निवडणुकीत 17 जागा आहेत. त्यापैकी नऊ प्रभाग महिला उमेदवारांसाठी आरक्षित असून अन्य दोन प्रभागांसह एकूण 27 महिला उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे पुरुष उमेदवारांपेक्षा गुहागरच्या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे. 

या निवडणुकीत प्रभाग 1 मध्ये राष्ट्रवादीकडून सुजाता बागकर या विद्यमान नगरसेविका रिंगणात आहेत. आपल्या कामाच्या जोरावर प्रभागात त्यांचे पारडे जड आहे. भाजपकडून दीपाली मोरे रिंगणात आहेत. प्रभाग--1 वर पूर्वीपासून भाजपचे वर्चस्व होते. गत निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले. त्यामुळे भाजपसाठी येथे आव्हान आहे. याच प्रभागात सेनेकडून प्राची आरेकर निवडणूक लढवत आहेत. प्रभाग-3 मध्ये शहर विकास आघाडीच्या मनाली सांगळे, राष्ट्रवादीच्या वर्षा गिजे, तर भाजपच्या अनघा आरेकर  रिंगणात आहेत. येथे शहर विकास आघाडीने आव्हान उभे केले आहे. 

प्रभाग 4 मध्ये शहर विकास आघाडीच्या नेहा सांगळे, राष्ट्रवादीच्या ऋतिका कानसरे, भाजपच्या श्रद्धा भोसले रिंगणात आहेत. प्रभाग-7 मध्ये राष्ट्रवादीच्या मनीषा कदम, सेनेच्या नीलिमा गुरव, भाजपकडून स्मिता रहाटे या निवडणूक लढवत असल्याने या ठिकाणी तिरंगी लढत आहे. प्रभाग-9 मध्ये चौरंगी लढत असून या ठिकाणी राष्ट्रवादीच्या मानसी शेटे, शहर विकास आघाडीच्या वैशाली मालप, आरपीआयच्या शितल कदम, भाजपच्या स्नेहल वरंडे रिंगणात आहेत. 

प्रभाग क्र. 11 मध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा स्नेहा भागडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शहर विकास आघाडीकडून उमेदवारी मिळवली आहे. येथे सेनेच्या महिला संघटक यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग -12 हा भाजपचा बालेकिल्‍ला आहे. मात्र, येथे तिरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादीच्या रूपा खातू, भाजपच्या भाग्यलक्ष्मी कानडे तर सेनेच्या रश्मी भावे या रिंगणात आहेत. प्रभाग-15 मध्ये सरळ लढत आहे. शहर विकास आघाडीच्या स्नेहल रेवाळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या सेजल संकेत गोयथळे यांची लढत आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची मानली जात आहे. प्रभाग-17 मध्ये भाजपच्या मृणाल गोयथळे, राष्ट्रवादीच्या श्रीया मोरे यांच्यामध्ये सरळ सामना आहे. 17 प्रभागांपैकी प्रभाग क्र. 1, 3, 4, 7, 9, 12, 15, 17 हे प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे येथे 25 महिला उमेदवार रिंगणात उतरल्या आहेत. दोन प्रभागांमध्ये सर्वसाधारण आरक्षण असून या ठिकाणी राष्ट्रवादीच्या स्वाती कचरेकर, शहर विकास आघाडीच्या प्रणिता साटले निवडणूक लढवित आहेत.