Sat, Apr 20, 2019 23:52होमपेज › Konkan › रानवी येथील बिबट्याचा मृत्यू केवळ भुकेमुळेच

रानवी येथील बिबट्याचा मृत्यू केवळ भुकेमुळेच

Published On: Jul 10 2018 10:47PM | Last Updated: Jul 10 2018 10:42PMगुहागर : प्रतिनिधी

गुहागर तालुक्यातील रानवी गावठाण येथे भक्ष्याच्या शोधार्थ आलेला बिबट्या एका घरामागे मंगळवारी आढळून आला. ही माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर त्याला उपचारासाठी चिपळुणात हलविण्यात आले. परंतु, भुकेमुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा बिबट्या पाच महिन्यांचा होता.

गुहागर तालुक्यातील रानवी येथील रमेश बारगोडे यांच्या घराशेजारी असलेल्या खोपटीखाली हा बिबट्या आढळून आला. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास उपासमारीने तडफडणार्‍या बिबट्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. यावेळी त्यांना बिबट्या दिसून आला. यानंतर रमेश बारगोडे यांनी रानवीचे पोलिस पाटील यांना माहिती दिली. पोलिस पाटलांनी गुहागर पोलिसांना कळविले. यानंतर  वनविभागाचे वनरक्षक आर. पी. बंबर्गेकर यांना कळवले. वनरक्षक आर. पी. बंबर्गेकर, सुरज तेली, रामदास खोत, चिपळूणचे वनपाल तटकी यांच्यासह तातडीने रानवी येथे रवाना झाले. 
दरम्यान, बिबट्याला पिंजर्‍यातून नेण्यासाठी चिपळूण येथून वनविभागाचे वाहन मागविण्यात आले.

 मात्र, हे वाहन येईपर्यंत उशीर होईल म्हणून एका खासगी वाहनातून बिबट्याला चिपळुणात आणण्यात आले. यानंतर पशुवैद्यकीय दवाखान्यात बिबट्याला नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान या बिबट्याचा मृत्यू झाला. यानंतर विच्छेदन करताना बिबट्याच्या अंगातून रक्ताचा थेंबही बाहेर पडला नाही. यामुळे उपासमारीने मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले.

दरम्यान, याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, रानवी येथे आढळलेला हा बिबट्या सुमारे चार ते पाच महिन्यांचा व मादी जातीचा होता. साधारण 1 वर्षभर पूर्ण वाढ होईपर्यंत आईच्या दुधावर व छोट्या भक्ष्यावर बिबट्याची पिल्ले अवलंबून असतात. मात्र, हा बिबट्या आपल्या आईपासून दुरावल्याने त्याची उपासमार झाली असावी, असा अंदाज गुहागरचे वनरक्षक आर. पी. बंबर्गेकर यांनी व्यक्त केला.