Sat, Dec 07, 2019 13:58होमपेज › Konkan › गुहागर न. पं.वरील सत्तेसाठी शक्‍तिप्रदर्शन

गुहागर न. पं.वरील सत्तेसाठी शक्‍तिप्रदर्शन

Published On: Mar 10 2018 11:02PM | Last Updated: Mar 10 2018 8:40PMशृंगारतळी : वार्ताहर

गुहागर नगर पंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीविरोधात भाजप व शहर आघाडी यांच्यात जोरदार चुरस सुरू आहे. ही नगर पंचायत ताब्यात घ्यायचीच, या उद्देशाने तिन्ही आघाड्या समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. 

गुहागर न.पं.साठी या निवडणुकीत जोरदार शक्‍तिप्रदर्शन सुरू आहे. गुहागर न. पं.मध्ये कुणबी विकास आघाडी तयार झाली असून तिला पाठिंबा देण्यावरून भाजपमध्ये खल चालला आहे. गुहागरचा नगराध्यक्ष थेट निवडणुकीने निवडायचा असून येणारा उमेदवार कुणबी आघाडीचा असेल यावर भाजपने होकार दर्शविल्याचे समजते. परंतु, या आघाडीच्या उमेदवाराला भाजपच्या चिन्हावर उभे राहण्याबाबत भाजपमध्ये आग्रह आहे तर भाजपचे चिन्ह घेण्यासाठी आघाडीत मतभेत आहेत. 

या सर्व पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे दोन सदस्य सोबत घेण्यास भाजप तयार आहे. परंतु, त्यावर शिक्‍कामोर्तब झालेले नाही. या अगोदरच शिवसेना  व भाजपचे काही कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. केवळ त्यांच्या नावाची घोषणा होण्याची बाकी आहे. या आठवड्यात दोन्ही बाजूंकडील उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँगे्रसची यादी जवळपास निश्‍चित झाली असून ते कुणबी आघाडी व भाजप यांच्या उमेदवार यादीची प्रतीक्षा करीत असल्याची चर्चा आहे.  

गुहागर नगर पंचायत निवडणूक आगामी गुहागर विधानसभेची नांदी ठरणार असून त्यामुळे ही निवडणूक भाजपने तसेच राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची बनविली आहे. गुहागर नगर पंचायतीला येणारा कोट्यवधी रूपयांचा निधी आपल्या हातात असावा, अशी भावना भाजपची आहे. मात्र, यामध्ये शिवसेना बॅकफूटवर असून मिळेल तेवढ्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी हा पक्ष आग्रही आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव हे कोणती राजकीय खेळी खेळतात, याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.