Fri, Feb 22, 2019 10:25होमपेज › Konkan › ‘घडाळ्याच्या काट्या’ने शिवसेना ‘घायाळ’

‘घडाळ्याच्या काट्या’ने शिवसेना ‘घायाळ’

Published On: Feb 24 2018 9:24PM | Last Updated: Feb 24 2018 9:24PMशृंगारतळी : वार्ताहर

गुहागर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक समीप येऊन ठेपली असून ऐन शिमगोत्सवात राजकीय धुळवड पाहायला मिळत आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसला शह देण्यासाठी इतर पक्षांनी मिळून आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, शिवसेनेचे काही पदाधिकारी फोडण्यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसला यश आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे घडाळ्याच्या काट्याने शिवसेना घायाळ झाल्याची चर्चा आहे.

गुहागर नगरपंचायत राष्ट्रवादी काँगे्रसच्या ताब्यात आहे. न. पं.ची निवडणूक जाहीर झाली असून विद्यमान सत्ताधार्‍यांविरोधात भाजप, सेनेने आघाडी उघडली आहे. कुणबी समाजाचे शहरातले प्राबल्य लक्षात घेता त्याचे मतांमध्ये परिवर्तन होण्यासाठी कुणबी विकास आघाडी तयार झाली आहे. शहरात न.पं.ने करोडो रूपयांच्या विकासाची कामे केली आहेत. परंतु, त्यांच्या दर्जाविषयी विरोधकांनी आक्षेप घेतले आहेत व हे मुद्दे प्रचारामध्ये घेतले जाण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे 22 मार्चला उमेदवार व थेट नगराध्यक्ष यांच्या नावाची घोषणा आ. भास्कर जाधव करणार होते. परंतु, अचानक लागलेल्या पक्षाच्या दौर्‍यामुळे ही घोषणा पुढे ढकलण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँगे्रस कोणाच्या नावाची घोषणा करते याकडे इतर पक्षांचे लक्ष असून त्या नंतरच ते आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, शिवसेनेचे  या निवडणुकीतले काही संभाव्य इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीच्या गळाला लागले असून त्यांना नगरसेवकपदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या या पेचाने शिवसेना, भाजप व आघाडीत चलबिचल निर्माण झाली आहे. शिवसेनेचे व आघाडीचे काही पदाधिकारी अजूनही राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केली आहे.