Sun, Jan 19, 2020 20:55होमपेज › Konkan › गाव समूहांद्वारे साधणार कोकणचा पर्यटन विकास!

गाव समूहांद्वारे साधणार कोकणचा पर्यटन विकास!

Published On: Mar 20 2018 10:50PM | Last Updated: Mar 20 2018 10:50PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी ग्रामीण कोकण विकास योजनेंतर्गत गावांचा समूह करून पर्यटनाच्या द‍ृष्टीने त्यांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण स्तरावर रोजगारांच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) जगदीश चव्हाण यांनी दिली.

या योजनेत कोकणातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावांचे समूह तयार करण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, कर्दे, खेड, गुहागर, वेळणेश्‍वर, आंबोली, गणेशगुळे, भालावली, वाडापूर, राजापूर या गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.  तसेच जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या विविध खाड्यांमध्ये ‘हाऊस बोट’सारखा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी खाड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी दाभोळ, बाणकोट, वाशिष्ठी नदीपत्रात हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला  आहे. या निर्णयानुसार दाभोळ व बाणकोट येथे लवकरच हाऊस बोटी पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

योजनेत स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करून देताना ‘निवास व न्याहरी योजना’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या योजनेत पर्यटकांच्या निवासाची सोय करण्यास महामंडळ परवाना देणार आहे. योजनेमध्ये समाविष्ट घरमालकांना शासनामार्फत ऐशआराम करामध्ये सवलत, घरगुती दराने स्वयंपाकाचा गॅस वापरण्यास मुभा व इतर परवान्यामध्ये सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे.

सध्या या योजनेमध्ये जिल्ह्यातील सहभागी घरमालकांची संख्या साडेतीनशे घरांमध्ये पोहोचली आहे. स्थानिक पातळीवर पर्यटनाच्या सुविधा मिळत असल्याने जिल्ह्यास भेट देणार्‍या पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याचे जगदीश चव्हाण यांनी सांगितले.