Fri, Jul 19, 2019 00:55होमपेज › Konkan › ग्रामविकास अधिकार्‍याची उचलबांगडी

ग्रामविकास अधिकार्‍याची उचलबांगडी

Published On: Mar 09 2018 11:29PM | Last Updated: Mar 09 2018 9:11PMआरवली : वार्ताहर 

धामापूर तर्फे संगमेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आठ ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले. त्यावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी याची दखल घेत हा महत्वाचा विषय उचलून धरला. अखेर ग्रामपंचायतीचे वादग्रस्त ग्रामविकास अधिकारी नारायण पवार यांची उचलबांगडी करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. ग्रामविकास अधिकारी नारायण पवार यांची बदली झाल्याने दिलेले राजीनामे मागे घेत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने अनंत गुरव आणि तुकाराम मेस्त्री यांनी दिली.

राजीनामे दिलेल्या सदस्यांमध्ये तुकाराम मेस्त्री, महेंद्र धनावडे, अनंत गुरव, स्वाती धनावडे, रघुनाथ भायजे, वैशाली भागडे, कल्पना जाधव, शीतल भायजे यांचा समावेश आहे. तेरा सदस्यसीय ही ग्रामपंचायत आहे. ग्रामस्थांना एक-एक महिना रहिवासी दाखले तसेच इतर महत्वाचे दाखले न देता ग्रामस्थांची अडवणूक करण्यात येते. तसेच ग्रा.पं. सदस्यांनी सुचवलेल्या कामांकडे दुर्लक्ष करणे, विकासकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, असे आरोप करून ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांकडे राजीनामे दिले होते. राजीनाम्याच्या प्रती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही देण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले. हा विषय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत घेण्यात आला. या समितीपुढे वादग्रस्त नारायण पवार यांच्यासह पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनाही पाचारण करण्यात आले. समितीमधील सदस्यांनी नारायण  पवार यांच्याकडे ग्रामपंचायत सद्स्यांच्या आरोपाबाबत खुलासा मागितला तेव्हा त्यांची फे-फे उडाली. ग्रामविकास अधिकारी हे जबाबदारीने वागत नाहीत तसेच आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याचे समोर आल्याने त्यांची बदली  करण्यात आली.