होमपेज › Konkan › ग्रामपंचायत गावच्या विकासाची केंद्रबिंदू

ग्रामपंचायत गावच्या विकासाची केंद्रबिंदू

Published On: Jul 07 2018 10:42PM | Last Updated: Jul 07 2018 10:42PMरत्नागिरी : प्रतिनिधी

ग्रामपंचायत ही गावच्या विकासाची केंद्रबिंदू असते तर सरपंच हा त्या गावचा मुख्यमंत्री असतो. 14 व्या वित्त आयोगाने ग्रामपंचायतींना स्थैर्य दिले आहे. परंतु, सरपंचांनी केवळ पाखाड्या आणि रस्ते तयार न करता शासकीय योजनांचा लाभ वैयक्तिक पातळीवर कसा होईल, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. यासाठी रत्नागिरी पंचायत समितीने तयार केलेली मार्गदर्शक पुस्तिका उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.

येथील जिल्हा परिषदेच्या आवारातील पेजे सभागृहात पंचायत समिती रत्नागिरीतर्फे विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा शनिवार दि. 7 रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. उदय सामंत, प्रभारी जि. प. अध्यक्ष संतोष थेराडे, पंचायत समिती सभापती विभांजली पाटील, उपसभापती सुनील नावले, जि. प. सदस्य उदय बने आदी उपस्थित होते. या पुस्तकाची संकल्पना सुनील नावले यांची असून, विवेक जमदाडे यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले आहे. 

यावेळी खा. राऊत म्हणाले की, गावच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही ग्रामपंचायतीची आहे. केंद्र, राज्य,जिल्हा परिषद व पंचायत समितीद्वारे राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची अंमलबजावणीचे महत्त्वपूर्ण काम ग्रामपंचायतीचे आहे. त्यासाठी ग्रामविकास अधिकारी व लोकप्रतिनिधींचा अभ्यासपूर्ण सहभाग असणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने त्यांना त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात दैनंदिन काम करीत असताना उपयुक्त ठरेल, अशी ही पुस्तिका आहे. ही पुस्तिका महाराष्ट्रभर पोहोचवू.

प्रत्येक ग्रामपंचायत ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून इंटरनेटशी जोडण्यात येत आहे. यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार अधिक गतिमान होईल. यासाठी जिल्हा परिषदेने दीड कोटींचा निधी दिल्यास ग्रामपंचायतींचा पहिल्या वर्षीचा बिलाचा भार कमी होईल. आपण कोकणात पर्यटनातून विकासासाठी प्रयत्नशील असून, येथील ग्रामस्थांनी स्वयंरोजगारातून समृद्धी साधावी, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक गजानन पाटील यांनी केले.