Fri, Apr 26, 2019 15:18होमपेज › Konkan › जिल्ह्यात ग्रामसभांद्वारे वृक्षलागवडीचा जागर!

जिल्ह्यात ग्रामसभांद्वारे वृक्षलागवडीचा जागर!

Published On: May 24 2018 1:32AM | Last Updated: May 23 2018 10:26PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शतकोटी वृक्ष लागवड अभियानात  यावर्षी कोकणसाठी 1 कोटी 33 लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. त्यापैकी जुलै महिन्यात सुरू होणार्‍या वृक्ष लागवड अभियानात जिल्ह्यासाठी सुमारे 35 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अभियानाच्या नियोजनानुसार 30 एप्रिलपर्यंत वृक्ष लागवडीचे क्षेत्र निश्‍चित करण्यात आले आहे. या मोहिमेला गावागावांतून प्रतिसाद मिळण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींतून जूनमध्ये पहिल्या पंधारवड्यात ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या ग्रामसभेद्वारे वृक्ष लागवडीत अभियानाचा जागर करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी दिली.

जुलै महिन्यात सुरू होणार्‍या वृक्ष लागवड अभियानात जिल्ह्यासाठी सुमारे 35 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानात शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था, क्रीडा मंडळे, ग्रामपंचायती आदींसह खासगी कंपन्या व्यवस्थापनांचा सहभाग घेण्यात येणार आहे. 

निश्‍चित केलेल्या वृक्ष लागवड क्षेत्रावर खड्डे मारण्यात येणार आहेत. कोकणच्या वातावरणानुसार झाडांची निवड करण्यात येणार आहे. आतापर्यंत या अभियानात करण्यात आलेल्या लागवडीपैकी 80 टक्के लागवड यशस्वी झाली आहे.

यासाठी  एक लाख हरित सैनिकांची फौज तयार करण्यात येणार आहे. हरित सैनिकांच्या पथकातर्फे गावातून या मोहिमेचा प्रसार करण्यात येणार आहे. जिओ टॅगिंगद्वारे  लागवडीचे ऑनलाईन अपडेट घेण्यात येणार आहे. तसेच त्याचे दर दोन महिन्यांनी मूल्यांकनही करण्यात येणार आहे. या मोहिमेेला गावातून प्रतिसाद मिळण्यासाठी जूनमध्ये ग्रामसभा आयोजित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जी गावे यामध्ये उल्लेखनीय काम करतील, अशा गावांना हरित गावाचा दर्जा देताना या गावांना शासनाच्या योजनांचा लाभ प्राधान्याने मिळणार आहे. त्यासाठी ग्रामसभा आयोजित करुन जास्तीत -जास्त क्षेत्र हरितपट्टयात  आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये गावातील स्वयंसेवी मंडळे, शाळा, महाविद्यालये महिला बचतगट, मित्र गट, कौटुंबिक सोहळे आदींच्या माध्यमातून सहभागासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

या ग्रामसभा जूनच्या पहिल्या पंधारवड्यात आयोजित करुन ग्रामस्थांना या बाबत सहभागाची माहिती देण्याचे सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यात 844 ग्रामपंचायतीत हा उपक्रम राबविण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.