Thu, Mar 21, 2019 23:46
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › वाहतुकीचे नियम पाळणे हिताचे : चंद्रकांत लाड

वाहतुकीचे नियम पाळणे हिताचे : चंद्रकांत लाड

Published On: Jan 06 2018 1:24AM | Last Updated: Jan 05 2018 10:47PM

बुकमार्क करा
खेड : वार्ताहर

वाहतुकीचे नियम पाळणे हे सर्वांच्याच हिताचे आहे, असे मत सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत लाड यांनी येथे व्यक्‍त केले. शुक्रवार दि.5 रोजी खेड जेसीआय संघटनेतर्फे आगामी कालावधीत सात दिवस चालणार्‍या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

खेड जेसीआय संघटनेतर्फे दि.5 ते 11 जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा प्रारंभ दि.5 रोजी भरणेनाका येथील पोलिस चौकीसमोर झाला. यावेळी भरणे ग्रामपंचायत सरपंच जाधव, जेसीआय खेडचे अध्यक्ष दीपक नलावडे, सेक्रेटरी अमोल दळवी, कार्यक्रम प्रमुख सतीश साठे, परमानंद बेंडखळे, जलाल राजपूरकर, शैलेश मेहता, प्रमोद कांबळे, पराग पाटणे, कोळेकर, संकेत अपिष्टे, वाहतूक पोलिस  कर्मचारी मोहिते, अस्मिता साळवी, बांगर, गृहरक्षक जवान विशाल गोगेकर आदी उपस्थित होते. 

यावेळी सहायक पोलिस निरीक्षक लाड म्हणाले की, जेसीआय खेड या संघटनेप्रमाणेच इतर संघटनांनी पुढाकार घेऊन समाजात जागृती करणारे उपक्रम राबवल्यास त्यामुळे निश्‍चित समाजातील अपप्रवृत्ती नष्ट होऊन नागरिक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त होतील. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने रस्त्यावर अपघाताचा धोका वाढतो. रस्ते अपघातात गंभीर जखमी होणार्‍यांची अथवा जीव गमावणार्‍यांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे जेसीआय खेडचा रस्ता सुरक्षा सप्ताह हा त्या द‍ृष्टीने महत्त्वाचा ठरतो. या  उपक्रमात केवळ जेसी सदस्यच नव्हे तर समाजातील सर्वच नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 
यावेळी प्रा. साठे यांनी जेसी रस्ता सुरक्षा सप्ताहाची माहिती दिली. या सप्ताहात शुक्रवार दि.5 रोजी प्रारंभा सोबतच सुरक्षा फलकांचे अनावरण करण्यात आले. दि.6 रोजी शहरातील शिवाजी चौकातून जनजागृती फेरी काढण्यात येईल, दि.7 रोजी शहरासह परिसरातील रस्त्यांवरील गतिरोधक रंगवणे व रूग्णवाहिका चालकांचा सत्कार करण्यात येईल. दि. 8 रोजी एल. पी. इंग्लिश स्कूल येथे रस्ता सुरक्षा संदर्भात विद्यार्थांसाठी वक्‍तृत्व स्पर्धा होईल. दि.9 रोजी नाना-नानी पार्क येथे रस्ता सुरक्षा विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थांसाठी चित्रकला स्पर्धा होईल. दि.10 रोजी भरणेनाका येथे राष्ट्रीय महामार्गा लगत वाहन चालकांची आरोग्य तपासणी शिबिर होईल. दि.11 रोजी शहरातील शाळांमध्ये जेसीआय संघटनेचे पदाधिकारी रस्ता सुरक्षेबाबत विद्यार्थांना मार्गदर्शन करणार आहेत.