Sat, Aug 24, 2019 22:17होमपेज › Konkan › काचेवरच्या कसरतीला शतकाची प्रतीक्षा!

काचेवरच्या कसरतीला शतकाची प्रतीक्षा!

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 8:58PMसंगमेश्‍वर : वार्ताहर 

बालपणीच पितृछत्र हरपले, आईने नोकरी करून आजीकडे ठेवत त्याचे शिक्षण पूर्ण केले. पुढे एका कन्स्ट्रक्शन कंपनीत काचेची कामे करता-करता त्याने केवळ तीन मि.मी.च्या काचेवर एक चित्रकृती निर्माण केली आणि बघता-बघता ही आविष्कारी कला त्याच्या उपजीविकेचे प्रमुख साधन बनली आहे. पुण्यातील विठ्ठलवाडीत राहणार्‍या राहुल लोहकरे या तरूणाच्या कलाकुसरीची ही वाटचाल असून आत्तापर्यंत तब्बल 99 काचप्रतिमा साकारणार्‍या राहुलला आता शतकीय प्रतिकृतीची प्रतीक्षा आहे.

अत्यंत दुर्मीळ काम असलेल्या या कलाकारीने त्याने अवलियाची उपमा साध्य केली आहे.विठ्ठलवाडीतल्या जगताप चाळीत केवळ दहा बाय दहाच्या खोलीत राहणार्‍या राहुलने 2005 साली बालाजीचे चित्र साकारले. ते विकलेही गेले आणि इथून त्याच्या या अद्वितीय कलाकारीला सुरवात झाली. गेल्या 12 वर्षांत राहुलने 99 प्रतिमा तयार केल्या आहेत. तो अवघ्या तीन मिलीमीटर काचेवर कलाकुसर करत त्यासाठी वेगवेगळ्या काचांचा आधार घेत वर्षातून केवळ 3 ते 4 प्रतिमाच तयार करतो. 

काचेवर चित्र साकारताना त्याच्या डिजिटल प्रिंटवर 12 ते 15 दिवसांचा अभ्यास होतो. त्यानंतर काचेचा शोध, ती योग्य आकारात कापणे, योग्य ठिकाणी रंग भरणे, योग्य ठिकाणी रंगीत काचा लावणे अशी जोखमीची कामे केली जातात. या कलेत झालेली छोटीशी चूकही संपूर्ण  चित्राचे नुकसान करते. राहुलची अदाकारी पाहून त्याला रत्नागिरीतील भैरीदेवस्थानाचेही चित्र काचेवर साकारण्याची ऑर्डर मिळाली. 
याबाबत राहुलला विचारले असता आपणाला पेन्सिलने कागदावर चित्र रेखाटायला सांगितले तर ते अवघड ठरेल मात्र काचेवर चित्र काढणे हा माझा छंद आहे. आईचा पाठींबा आणि कलाकृतींना असलेली मागणी या जोरावरच माझी ही कला आज जिवंत राहिल्याचे तो आवर्जुन नमूद करतो.  कॅलिफोर्निया आर्ट कॉम्पिटिशनच्या स्पर्धेत राहुलच्या कलाकारीचा 11 वा क्रमांक आला आहे, हीच माझ्या कलेची पोचपावती असल्याचे तो सांगतो.