Wed, May 22, 2019 22:25होमपेज › Konkan › अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणास कारावास

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणास कारावास

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 22 2018 10:18PMसिंधुदुर्गनगरीः प्रतिनिधी

घरात कुणी नसल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून कुणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा-सावरजुवा येथील प्रवीण परब याला येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी 3 वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. 

दरम्यान या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात जाण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला असून यासाठी 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्‍ता स्वप्निल सावंत यांनी काम पाहिले.

आरोपी प्रवीण परब (39) हा दळण दळून घेण्यासाठी त्या पीडित मुलीच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याने त्या मुलीला बोलावून घेतले आणि दळण तिच्याकडे दिले व पिण्यासाठी पाणी मागितले. दरम्यान घरात कुणी नसल्याचे संधी साधत त्याने त्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तसेच याबाबत कुणास सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली.  हा गुन्हा 12 मार्च 2017  रोजी घडला होता याबाबतची तक्रार पीड़ित मुलीच्या आईने सावंतवाडी पोलिसांत दिली होती. या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलिसांनी लहान मुलांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल करून 13 मार्च 2017 रोजी परब याला अटक केली होती. 

या खटल्याची सुनावणी येथील विशेष न्यायालयात चालली. यात आठ साक्षीदार तपासण्यात आले. यातील पीड़ित मुलगी, तिची लहान बहिण, आत्या आणि खाजगी शिकवणीच्या शिक्षिका यांची साक्ष महत्वाची ठरली. या प्रकरणाचा तपास सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आर. एस. तोरस्कर यांनी केला. आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाल्याने  त्याला कलम 354 खाली 3 वर्षे सश्रम कारावास व 1 हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महीना साधी कैद, 354 - (श्र)(ळ) खाली 3 वर्षे सश्रम कारावास व 1 हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महीना साधी कैद, 451 खाली 1 वर्ष सश्रम कारावास व 1 हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महीना साधी कैद, 504 खाली 1 वर्ष सश्रम कारावास व 1 हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास साधी कैद, 506 खाली 1 वर्ष सश्रम कारावास व 1 हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महीना साधी कैद आणि  ही सर्व शिक्षा एकत्रित भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सुनावणी अंती विशेष न्यायाधीश श्री जगमलानी यांनी विविध कलमान्तर्गत तिन वर्षे सश्रम कारावास आणि 5 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनाविली आहे. 5 हजार डंडा पैकी 4 हजार रुपये संबंधित पीड़ित मुलीला द्याव्याचे आहेत. वेगवेगळ्या कलमान्तर्गत देण्यात आलेली शिक्षा आरोपीने एकत्रित भोगावयाची आहे.